मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसने वित्त खात्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाम मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वित्त खाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची मागणी केली. ‘आम्हाला दुसरे काही नको, वित्त खातेच हवे,’ अशी स्पष्ट भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. या भेटीमुळे महायुतीतील खातेवाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
अजितदादांकडे होते वित्त खाते!
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे महायुती सरकारमध्ये वित्त खाते होते. त्यांच्या निधनानंतर हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने या खात्यावर दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा भुजबळ यांनी केला; मात्र निर्णयासाठी कोणतीही निश्चित मुदत देण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना नकार
राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून काही मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चांवर भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले. मंत्र्यांना बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला!
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या विलीनीकरणाच्या चर्चाही भुजबळ यांनी फेटाळल्या. हा विषय आता संपलेला अध्याय असल्याचे सांगत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. दुसरीकडे, शरद पवार यांनीही पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले होते.
दुष्काळी मदतीसाठी मोठ्या निधीची गरज
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या आर्थिक मदतीचा मुद्दाही भुजबळ यांनी उपस्थित केला. शेतकरी कर्जमाफी, दुष्काळ निवारणासाठीचे मदत हप्ते आणि अन्य आर्थिक तरतुदींसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने ३५८ पैकी ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वित्त खात्याची मागणी केली आहे.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या मागणीला कितपत प्रतिसाद देतात आणि वित्त खात्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


