मुंबई प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी आगामी दोन ते तीन महिन्यांत राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
मनोज जरांगे यांनी माध्यमांसमोर आणलेल्या ऑडिओ क्लिपनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच गणेश नाईक यांच्या विधानाने चर्चेला आणखी उधाण आले आहे.
पत्रकारांशी बोलताना नाईक म्हणाले, “१९९० च्या दशकापासून मी ज्या गोष्टी बोललो, त्या उशिराने का होईना, पण खऱ्या ठरल्या आहेत.” सध्या दूरचित्रवाणीवर सुरू असलेल्या घडामोडींशी आपल्या विधानाचा संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील पाच-सहा महिन्यांत किंवा दोन-तीन महिन्यांत राजकारणात अनेक घडामोडी घडतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सत्कर्म आणि दुष्कर्माच्या परिणामांचाही उल्लेख केला. सत्कर्माची फळे चांगली, तर दुष्कर्माची फळे विषारी असतात, हा निसर्गाचा नियम असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरही नाईक यांनी यापूर्वी भूमिका मांडली होती. पूर्णेकर कोणत्या पक्षाचे होते, यापेक्षा ते सामाजिक कार्यकर्ते होते, असे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात अनेकांना अटक झाली असून, सखोल तपास सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाकडे लक्ष दिले असल्याचे नाईक यांनी सांगितले. तपासातून खरे गुन्हेगार समोर येऊन त्यांना कायद्यानुसार शिक्षा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “राजकीय संघर्ष हा राजकीय पातळीवरच असायला हवा; तो जीव घेणारा संघर्ष नसायला हवा,” असेही नाईक म्हणाले.


