विटा/सांगली प्रतिनिधी
जुन्या भांडणाचा राग मनात धरून यंत्रमाग कामगाराच्या डोक्यात फरशीचे घाव घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना विटा शहरातील दत्तनगर परिसरात घडली. इम्तियाज शमशुद्दीन अन्सारी (वय ४२, सध्या रा. दत्तनगर, विटा; मूळ रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी विजय शंकर चव्हाण (वय ३१, रा. मेटकरी वस्ती, विटा) याला विटा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली.
जुन्या वादातून टोकाचे पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्तियाज अन्सारी आणि विजय चव्हाण हे दोघेही विटा येथील पॉवरलूम कारखान्यात कामाला होते. कारखान्याचे मालक सचिन नंदकुमार भागवत यांच्या मालकीच्या खोलीत इम्तियाज राहत होता. याच ठिकाणी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी जुन्या भांडणाच्या रागातून विजय चव्हाण याने इम्तियाजच्या डोक्यात फरशीचे घाव घातले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इम्तियाजचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे दत्तनगर परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी सचिन नंदकुमार भागवत (वय ३५, रा. आदर्शनगर, लेंगरे रोड, विटा) यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय चव्हाण याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांचा सापळा; ४८ तासांत आरोपी अटकेत
खुनाच्या घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी विटा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस हवालदार अमोल पाटील आणि पोलिस कर्मचारी महेश देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी लेंगरे रोडवरील भांबर्डे टेक परिसरात सापळा रचला. या कारवाईत विजय चव्हाण याला घटनेनंतर ४८ तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले.
अटकेनंतर आरोपीला विटा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या खुनामागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित अन्य बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे करीत आहेत.


