मुंबई प्रतिनिधी
मुंबई : एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा इशारा परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. प्रवाशांना स्वच्छ आणि आरोग्यदायी सुविधा देण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित स्वच्छता आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे सर्व विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते.
प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार घेतला जातो. या रकमेच्या बदल्यात प्रवाशांना किमान स्वच्छतेच्या सुविधा मिळणे अपेक्षित आहे. बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ असल्यास एसटीच्या प्रतिमेवर परिणाम होतो. त्यामुळे स्वच्छतेच्या कामात कोणतीही कुचराई करू नये, असे सरनाईक यांनी सांगितले.
बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करावी आणि कंत्राटदार संस्थांकडून करारानुसार स्वच्छता करून घ्यावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. केवळ कंत्राटदारांवर जबाबदारी टाकून चालणार नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांनीही आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेवर लक्ष ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
एसटी ही सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासासोबत स्वच्छ बसस्थानके व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबत प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहनही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.


