मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपकडून आपल्या नावाने ५०० कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या आरोपावरून जरांगे यांनी शिंदेंना उत्तर देण्याचे आव्हान दिले होते. अखेर बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी हा आरोप फेटाळून लावत, “आम्ही कोणाला ५०० कोटी रुपये दिलेही नाहीत आणि घेतलेही नाहीत. पुरावे असतील तर ते सादर करावेत,” असे स्पष्ट प्रत्युत्तर दिले. त्यामुळे जरांगे यांच्या आरोपांवरून राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी (२० ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा आरोप केला होता. या आरोपाला शिंदे यांनी दसरा मेळाव्यात उत्तर द्यावे, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली होती. मात्र, दसरा मेळाव्यात यावर भाष्य न करता शिंदे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
“आधी शहानिशा करायला हवी होती!”
एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही कोणाला ५०० कोटी रुपये दिलेले नाहीत किंवा कोणाकडून घेतलेलेही नाहीत. पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मनोज जरांगे ज्या काही आधारावर बोलत असतील, तर त्यांनी आधी त्याची शहानिशा करायला हवी होती. कोणताही आरोप करण्यापूर्वी त्याची खातरजमा करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे या आरोपासंदर्भात काही पुरावे असतील, तर त्यांनी ते सादर करावेत.”
पुढे बोलताना शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आणि कामाच्या पद्धतीचा उल्लेख केला. “एकनाथ शिंदे यांना संपूर्ण महाराष्ट्र आणि देश ओळखतो. माझ्या कामाची पद्धत सर्वांना माहीत आहे. अनेक जण एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन प्रसिद्धी मिळवण्याचा आणि मथळे गाजवण्याचा प्रयत्न करतात,” अशी टीकाही त्यांनी केली.
जरांगेंना राजकीय व्यासपीठ टाळण्याचा सल्ला
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना शिंदे यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. जरांगे हे मराठा समाजासाठी काम करत असल्याने आपणही त्यांना मदत केली होती. मात्र, त्यांनी समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे आणि आंदोलनाचा वापर राजकीय व्यासपीठ म्हणून करू नये, असे शिंदे म्हणाले.
“मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. कुणबी प्रमाणपत्रे, आरक्षण आणि ५,३०० लोकांना अधिसंख्य पदांवर नोकऱ्या देण्यासारखे निर्णय आम्ही घेतले. गेल्या अनेक दशकांपासून मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना जे करता आले नाही, ते आम्ही करून दाखवले,” असा दावा त्यांनी केला.
‘मराठा आरक्षण देताना इतरांचे आरक्षण कमी केले नाही’
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना एकनाथ शिंदे यांनी, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही, असे सांगितले. कोणाचेही आरक्षण काढून घेतले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. आजही हे आरक्षण टिकून आहे,” असे शिंदे म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. शिंदे यांनी आरोप स्पष्टपणे फेटाळून लावत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले असले, तरी जरांगे यांची यावर पुढे काय भूमिका असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


