मुंबई प्रतिनिधी
मुंबई : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात, असा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे केवळ भाकीत नसून आपण सत्य सांगत असल्याचा दावाही त्यांनी केला. लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील साबरमती तुरुंगात असताना त्याचा ताबा इतर राज्यांतील पोलिसांना का दिला जात नाही, असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि चंदीगड पोलिसांना बिश्नोई अनेक खून प्रकरणांत हवा आहे. पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात पंजाब पोलिसांना त्याचा ताबा हवा आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनीही बिश्नोईचा ताबा मागितला होता. सलमान खान प्रकरणातही त्याची मागणी करण्यात आली असून, आता टायगर श्रॉफ प्रकरणातही अशी मागणी होऊ शकते, असे राऊत यांनी म्हटले.
एखादा आरोपी दुसऱ्या राज्यातील पोलिसांना हवा असल्यास त्याच्या ताब्यासाठी प्रयत्न केले जातात. परदेशातून आणि म्यानमारमधूनही गुन्हेगारांना भारतात आणले जाते. मग साबरमती तुरुंगात असलेल्या बिश्नोईचा ताबा संबंधित राज्यांच्या पोलिसांना का दिला जात नाही, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. बिश्नोई हे केवळ नाव असून, त्याच्या नावाखाली हवे ते गुन्हे करून घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी अमित शाह यांच्यावर केला. मात्र, हे राऊत यांचे आरोप आहेत.
बॉलिवूडवर दहशत निर्माण केली जात असून, अमित शाह आणि गुजरातमधील काही लोकांचा बॉलिवूडवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही राऊत यांनी केला. देशातील राजकीय घडामोडींना वेग आल्यास आणि सत्तांतराचा मुद्दा पुढे गेल्यास बिश्नोईच्या नावाखाली विरोधकांवर हल्ले होऊ शकतात, तसेच त्यांच्या हत्या होण्याचीही शक्यता असल्याचे ते म्हणाले. भाजपचा बिश्नोई कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि सध्या त्यांच्यात अस्वस्थता असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ठाकरे गटातील सत्तांतराच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी, त्यांच्या पक्षातील सत्तांतर दिल्लीतून लॉरेन्स बिश्नोईच्या माध्यमातून घडवून आणल्याचा आरोप केला. शिवसेनेचे फलक लावून भाषण करणारे काही जण हे बिश्नोईचे छोटे साथीदार असल्याचे ते म्हणाले. गुजरातमधून दिल्लीत असलेल्या मोठ्या बिश्नोईच्या माध्यमातून धमक्या, ताकद आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या जोरावर सत्तांतर घडवून आणले गेले; ते केवळ मतांच्या जोरावर झाले नव्हते, असा दावाही संजय राऊत यांनी केला.


