स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करत १० कोटी १६ लाख रुपये किमतीचे २ किलो ३२ ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, परराज्यातील तस्करी करणाऱ्या टोळीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कारवाईत हेरॉईनसह ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशानुसार शहरात अंमली पदार्थांची तस्करी आणि खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने ही कारवाई केली. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी कांदिवली पश्चिम येथील गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पहिली कारवाई केली.
या कारवाईत दोन आरोपींकडून ७५८ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत ३ कोटी ७९ लाख रुपये होती. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिसऱ्या आरोपीकडून आणखी १ हजार २७४ ग्रॅम हेरॉईन जप्त केले. या साठ्याची किंमत अंदाजे ६ कोटी ३७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही कारवायांमध्ये मिळून २ हजार ३२ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याची एकूण किंमत १० कोटी १६ लाख रुपये आहे.
या प्रकरणात बोरीवली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हेरॉईनची तस्करी करणे आणि ते जवळ बाळगल्याच्या आरोपाखाली तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात परराज्यातील तस्करांच्या टोळीचा सहभाग असल्याचे तपासात समोर येत असल्याने, अंमली पदार्थांचा पुरवठा करणारे आणि त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णाकांत उपाध्याय, पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखेच्या कक्ष ११ अंतर्गत कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, विश्वास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला थोरात, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


