मुंबई प्रतिनिधी
मुंबई : व्हॉट्सॲपवरील नग्न व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देऊन घाटकोपरमधील ६१ वर्षीय व्यक्तीकडून सुमारे चार कोटी रुपये उकळल्याच्या आरोपाखाली नाझिया मेहमूद शेख ऊर्फ नाझनीन हिला अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या पाच लाख रुपयांपैकी काही रक्कम स्वीकारताना मुंबई गुन्हे शाखा कक्ष सातच्या पथकाने तिला रंगेहाथ पकडले.
तक्रारदार घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर परिसरात कुटुंबासह राहतात. ते २०१० पासून कुर्ल्यातील नातेवाइकांच्या दागिन्यांच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करत होते. २०२० मध्ये दागिने खरेदीसाठी दुकानात येणाऱ्या एका महिलेच्या माध्यमातून त्यांची नाझियाशी ओळख झाली. पुढे दोघांमध्ये संपर्क वाढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मार्च ते डिसेंबर २०२४ या काळात नाझियाने आर्थिक अडचणी असल्याचे सांगून तक्रारदाराकडून सुमारे दहा लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या काळात तिने त्यांना व्हॉट्सॲपवर नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल केला. या संभाषणाचे चित्रण चेन्नई पोलिसांकडे असल्याचे सांगून ते प्रसारित होऊ नये, यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
बदनामीच्या भीतीने दागिने वितळवले
व्हिडीओ सार्वजनिक झाल्यास बदनामी होईल, या भीतीने तक्रारदाराने सोन्याचे दागिने वितळवून मिळालेले तीन लाख रुपये आणि दुकानाच्या गल्ल्यातील आणखी तीन लाख रुपये नाझियाला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, त्यानंतरही कथित व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देऊन आणि प्रकरण मिटवून घेण्याच्या नावाखाली नाझियाने सुमारे चार कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाची तक्रार मुंबई गुन्हे शाखेकडे आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तक्रारदाराचा जबाब नोंदवला जात असताना नाझियाचे पैशांसाठी फोन येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी एल.बी.एस. मार्गावरील राधाकृष्ण हॉटेलजवळ सापळा रचण्याचे ठरवले.
पाच लाखांच्या बंडलमध्ये खेळण्यातील नोटा
पोलिसांनी खंडणीसाठी देण्यात येणाऱ्या पाच लाख रुपयांच्या बंडलमध्ये ५०० रुपयांच्या २० खऱ्या नोटा आणि खेळण्यातील ९८० नोटा ठेवल्या होत्या. ठरल्याप्रमाणे दुपारी दीडच्या सुमारास नाझिया रक्कम स्वीकारण्यासाठी आली. तिने पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने तिला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


