स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : वडाळा येथील आर. ए. के. चार रोडवरील आलीशान हॉटेलजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणात माटुंगा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.१५ ते ९.४५ च्या सुमारास पूर्वीच्या रागातून दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.२८ वाजता माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली. फिर्यादीने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपींचा शोध सुरू असताना तांत्रिक तपासातून ते वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी झोपडपट्टी परिसरात सापळा रचून मोहम्मद अली वकील अहमद खान (वय २२) आणि हमजा वकील अहमद खान (वय १८) या दोघांना ताब्यात घेतले. दोघेही मजुरीचे काम करत असून, अॅन्टॉप हिल येथील बंगाली पूरा परिसरातील गेट क्रमांक ४, नुराणी मस्जिदजवळ राहतात.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त अनुराग जैन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त माधुरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे यांच्या सूचनांनुसार करण्यात आली.


