स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावरून एक वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. आई-वडील झोपेत असल्याची संधी साधून एका महिलेने बालिकेला पळवून नेले. मात्र, सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत अवघ्या २४ तासांत बालिकेचा शोध घेतला आणि आरोपी महिलेला अटक केली.
ही घटना १५ आणि १६ ऑक्टोबर २०२६ च्या मध्यरात्री घडली. फिर्यादी महिला आपल्या पती आणि एक वर्षाच्या मुलीसह धाराशिव येथील गावी जाण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. रात्री ७ वाजण्याच्या सुमारास त्यांची रेल्वे निघून गेल्याने त्या मुख्य मार्गावरील फलाट क्रमांक १२ आणि १३ समोरील स्टीलच्या बाकड्याजवळ झोपल्या होत्या. १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते ५.२५ वाजण्याच्या दरम्यान, पालक झोपेत असल्याचा फायदा घेत एका अनोळखी महिलेने त्यांच्या मुलीला पळवून नेले.
मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७६०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी तातडीने चार पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा
पोलिसांनी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक साधनांचा वापर करून आरोपी महिलेच्या हालचालींचा माग काढला. ही महिला बालिकेला घेऊन सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक २ वरून पहाटे ५.२२ वाजता पनवेल स्लो लोकलमध्ये बसल्याचे तपासात समोर आले. पुढे तिने लोकल बदलली आणि दिवा रेल्वे परिसरात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गुप्त बातमीदार आणि स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी महिला दिव्यातील सद्गुरू नगर येथे राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या राहत्या ठिकाणाचा शोध घेऊन बालिकेसह तिला ताब्यात घेतले. चौकशीनंतर आणि गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली.
आरोपी महिलेवर यापूर्वीही चोरीचे गुन्हे
पोलिसांनी आरोपी महिलेची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता, तिच्याविरुद्ध दादर रेल्वे पोलीस ठाणे आणि सायन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीबाबत सुरुवातीला ठोस माहिती नसतानाही सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या मदतीने पोलिसांनी २४ तासांच्या आत गुन्ह्याचा छडा लावला.
ही कामगिरी लोहमार्ग मुंबईचे पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपआयुक्त प्रज्ञा जेडगे आणि सीएसएमटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सोपान काकड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे, लोकल क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक कदम, तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांच्यासह सीएसएमटी रेल्वे पोलीस, गुन्हे प्रकटीकरण पथक आणि गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


