मुंबई प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर जुहू येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील तीन संशयितांना राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी दोघे हरियाणातील, तर एक जण बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
Rajasthan: Three accused in the firing incident involving actor Tiger Shroff in Mumbai have been arrested by Kota Police. Two are residents of Haryana and one of Bihar. The Kota City Police team apprehended them from a train, Kota SP Tejaswani Gautam confirmed to ANI pic.twitter.com/KKk95sinfi
— ANI (@ANI) October 19, 2026
जुहू येथील पुष्पा नरसी पार्कजवळ रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात टायगर श्रॉफ बचावला; मात्र त्याचा चालक फिरदोश आणि उमेश चव्हाण नावाचा पादचारी जखमी झाले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) व ३(५), तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ आणि २५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी टायगर श्रॉफच्या चालकाचा जबाब नोंदवला असून मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. गोळीबारानंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी १५ पथके तयार केली होती. या पथकांच्या तपासातून संशयितांना राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या वतीने स्वीकारण्यात आल्याचा दावा करणारी सोशल मीडिया पोस्टही समोर आली आहे. पोलिसांकडून या पोस्टची चौकशी सुरू असली, तरी या दाव्याची अद्याप अधिकृत पडताळणी झालेली नाही. तसेच, गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचा थेट संबंध असल्याचेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या तिघांची चौकशी आणि पुढील तपासातून या हल्ल्यामागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


