मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून, या आंदोलनाला यूट्यूबर ध्रुव राठीनेही पाठिंबा दिला आहे. १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ध्रुव राठी लंडनला पोहोचला असून, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवण्याची घोषणा त्याने केली आहे. लंडनमधील पार्लमेंट स्क्वेअर येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्याचे आवाहन त्याने समर्थकांना केले आहे.
ध्रुव राठी ९ ऑक्टोबर रोजी जर्मनीहून भारतात दाखल झाला होता. त्यानंतर गुरुग्राम येथील त्याच्या घरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले; मात्र काही वेळातच त्याची सुटका करण्यात आली. भारतात आल्यानंतर ध्रुव राठीवर तो भारतीय नागरिक नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर त्याने पासपोर्ट दाखवून स्पष्टीकरण दिले. तसेच, २०१८ मधील एका प्रकरणात न्यायालयाने त्याला समन्स जारी केले होते.
लंडनला पोहोचल्यानंतर ध्रुव राठीने ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आंदोलन करण्याचे संकेत दिले. भारतातील आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या महत्त्वाच्या नेत्यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवल्याचा उल्लेखही या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे. भारतातील आंदोलनाची धग आता परदेशातही पोहोचत असल्याचे चित्र आहे. भारतीय उच्चायोगासमोर एनएसयूआयच्या समर्थकांनीही आंदोलन केले.
ध्रुव राठीने व्हिडीओच्या माध्यमातून परदेशात आवाज उठवण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. ज्ञानेश कुमार यांनी देशाशी गद्दारी केल्याचा आणि लोकशाहीचा गळा दाबल्याचा आरोप त्याने केला. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले जात असल्याचे सांगत जगभरातील अनिवासी भारतीयांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्याने केले. आपल्या भूमिकेशी सहमत असलेल्या नागरिकांनी लंडनमधील पार्लमेंट स्क्वेअर येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर दुपारी १२ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन ध्रुव राठीने केले आहे.


