मावळ प्रतिनिधी
वडगाव मावळ : आंद्रा धरणग्रस्तांच्या गेल्या २६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि. २२) तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय शेतकरी आणि धरणग्रस्तांच्या बैठकीत घेण्यात आला. प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंद्रा धरणातून पाणी बाहेर नेण्याच्या योजनांना सहकार्य करणार नसल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. बंदिस्त पाइपलाइनचे सुरू असलेले काम तातडीने थांबवावे, अशी मागणीही करण्यात आली.
टाकवे बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिरात आंद्रा धरणग्रस्त आणि परिसरातील शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत गेल्या २६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शासनाकडून मागण्यांची दखल घेऊन ठोस निर्णय घेतला जात नसल्याबद्दल उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. बाधित शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
आंद्रा धरणातून तळेगाव, पिंपरी-चिंचवडसह वडगाव मावळला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. याशिवाय ठोकळवाडी धरणातील पाणीही बाहेर नेण्याच्या प्रस्तावित हालचालींबाबत धरणग्रस्तांनी विरोध दर्शविला आहे. स्थानिक शेतकरी आणि धरणग्रस्तांचे प्रश्न अद्याप सुटलेले नसताना बाहेरील शहरांसाठी पाणी नेण्याच्या योजनांना प्राधान्य का दिले जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
बंदिस्त पाइपलाइनचे काम तातडीने थांबवले नाही, तर शेतकरी आणि धरणग्रस्त प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन काम रोखतील, असा इशारा बैठकीत देण्यात आला. या प्रश्नावरून परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासन आणि प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा, अशी मागणीही करण्यात आली. केवळ आश्वासने न देता प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली.
आगामी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आंदर मावळ परिसरातील धरणग्रस्तांना एकत्र आणण्यावर बैठकीत भर देण्यात आला. गुरुवारी २२ तारखेला होणाऱ्या मोर्चात आंदर मावळातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. धरणग्रस्तांच्या मागण्यांची सोडवणूक झाल्याशिवाय पाणी बाहेर नेण्याच्या योजनांना सहकार्य करणार नसल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.


