मुंबई प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्याचा शिवाजी पार्क मैदानावरील मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागाने खासदार अनिल देसाई यांच्या अर्जानंतर मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी देताना पालिकेने आयोजकांसमोर तब्बल २४ अटी ठेवल्या आहेत. ध्वनिप्रदूषण, मैदानाची स्वच्छता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर पालिकेने स्पष्ट बंधने घातली आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचे स्वतंत्र दसरा मेळावे होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवरील मेळाव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा ठाकरे गटाला १९ ऑक्टोबर रोजी पूर्वतयारीसाठी, तर २० ऑक्टोबर रोजी मुख्य मेळाव्यासाठी मैदान वापरण्याची परवानगी मिळाली आहे.
पालिकेच्या अटींनुसार, मैदानाच्या वापरासाठी प्रतिदिन ५०० रुपये भाडे आणि त्यावर १८ टक्के वस्तू व सेवा कर, तसेच २५० रुपये परवाना शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय २० हजार रुपयांची अनामत रक्कम आगाऊ जमा करणे बंधनकारक आहे. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता मैदानाचा ताबा मिळणार असून, रात्री १२ वाजेपर्यंत मैदान रिकामे करावे लागणार आहे.
उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्रमांक २१८/२०१० आणि संबंधित आदेशांनुसार शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र असल्याने त्यासंबंधीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. रात्री १० नंतर ध्वनिवर्धक किंवा लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी आयोजकांवर असेल. मैदानात कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही, तसेच वाहनतळाची व्यवस्थाही करता येणार नाही.
मैदानात खोदकाम करणे, खड्डे पाडणे, खिळे ठोकणे किंवा अन्य प्रकारे नुकसान करण्यास बंदी आहे. कार्यक्रम संपल्यानंतर कचरा, घाण आणि निर्माल्य हटवून मैदान पूर्ववत करावे लागणार आहे. मैदानाचे नुकसान झाल्यास अनामत रक्कम जप्त केली जाईल आणि पुढील वर्षी परवानगी नाकारली जाऊ शकते, असा इशारा पालिकेने दिला आहे. तसेच, स्टेजसाठी खोदकाम किंवा पक्के बांधकाम करण्यास मनाई असून, बॅनर आणि जाहिरातींसाठी संबंधित विभागाची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल.
मेळाव्यासाठी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाची स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक आहे. रस्ता किंवा पदपथावर अतिक्रमण करून नागरिकांना अडथळा निर्माण करता येणार नाही. मैदानात स्वयंपाक करणे, चूल पेटवणे किंवा अग्नीचा वापर करण्यासही मनाई आहे. विद्युत जोडणीसाठी नियमानुसार परवानगी घेऊन सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कार्यक्रमातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची राहणार आहे. कोणताही गोंधळ किंवा आक्षेपार्ह भाषण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि विम्याची जबाबदारीही आयोजकांवर असेल. नैसर्गिक कारणांमुळे किंवा पावसामुळे कार्यक्रम रद्द झाल्यास त्यासाठी पालिका जबाबदार राहणार नाही. पालिकेने परवानगी रद्द केल्यास आयोजकांना नुकसानभरपाई किंवा अन्य दावा करता येणार नाही.
ही परवानगी केवळ मैदान वापरण्यापुरती असून, अन्य आवश्यक परवानग्या स्वतंत्रपणे घ्याव्या लागणार आहेत. परवानगी दुसऱ्या कोणाकडे हस्तांतरित करता येणार नाही. अटींचा भंग झाल्यास जी-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना परवानगी रद्द करण्याचा अंतिम अधिकार राहणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली असली, तरी पालिकेच्या २४ अटींचे पालन आयोजकांना करावे लागणार आहे.


