पुणे प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि लावणी क्षेत्रातील एका प्रतिभावान कलावंताचा प्रदीर्घ प्रवास संपला आहे.

२८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे मधु कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कलाप्रवासाला सुरुवात केली. लावणी आणि तमाशाच्या माध्यमातून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. चित्रपटांबरोबरच लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. लावणी सादर करण्याची त्यांची स्वतंत्र शैली आणि सहजसुंदर अभिनय यामुळे त्या महाराष्ट्रातील रसिकांच्या परिचयाच्या झाल्या.
ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून मधु कांबीकर यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. त्यानंतर ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. आई आणि सासूच्या व्यक्तिरेखांसह अनेक भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारल्या. चित्रपटांतील अभिनयासोबतच लावणी आणि तमाशाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदानही महत्त्वाचे ठरले.
मधु कांबीकर यांच्या आयुष्यात २७ नोव्हेंबर २०१६ हा दिवस अत्यंत कठीण ठरला. मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमातून त्या तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा नृत्य सादर करणार होत्या. कार्यक्रम सुरू असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती बिघडत असतानाही त्यांनी सादरीकरण थांबवले नाही. जिद्दीने कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर त्या मेकअप रूममध्ये गेल्या. तेथे त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि उजवा हात बधीर झाल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पक्षाघाताच्या या धक्क्यानंतर त्यांची प्रकृती हळूहळू खालावत गेली. आजारपणामुळे त्यांना अभिनय आणि आपल्या कलेपासून दूर राहावे लागले. पुढील काळात त्या अंथरुणाला खिळून राहिल्या. अनेक वर्षे रंगभूमीवर आपल्या कलेने रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या मधु कांबीकर यांना पुन्हा पूर्वीप्रमाणे सादरीकरण करता आले नाही. रंगमंचापासून दूर राहण्याची वेळ आल्याने त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.
त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाची दखल घेत २०१८ मध्ये झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः उपस्थित राहता आले नाही. त्यांच्या वतीने सून शीतल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता.
लावणी, तमाशा, चित्रपट आणि रंगभूमी अशा विविध क्षेत्रांत आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या मधु कांबीकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वाची मोठी हानी झाली आहे. आपल्या कलागुणांनी आणि वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणाने त्यांनी रसिकांच्या मनात निर्माण केलेले स्थान कायम राहणार आहे.


