पुणे प्रतिनिधी
पुणे : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्ह्याने ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळविले, तर पुणे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. ग्रामविकास, आर्थिक स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्याच्या प्रयत्नांना या यशामुळे मोठे बळ मिळाले आहे.

नाशिक येथे रविवारी (११ ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सभापती अमोल नलावडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या स्पर्धेत नाशिक जिल्हा परिषदेने प्रथम, तर सांगली जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक मिळविला.
२७६ ग्रामपंचायतींचा सहभाग; आर्थिक स्वावलंबनावर भर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील २७६ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. ग्रामपंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण, गावांमधील मूलभूत सुविधांचा विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, महिला आर्थिक सक्षमीकरण आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या बाबींना प्राधान्य देण्यात आले.
गावांच्या विकासासाठी केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर उत्पन्नाचे स्रोत बळकट करणे, घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली वाढविणे आणि लोकसहभागातून विकासकामांसाठी निधी उभारणे यावर विशेष भर देण्यात आला. या प्रयत्नांतून सहभागी ग्रामपंचायतींनी घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून सुमारे २४५ कोटी रुपयांची करवसुली केली. तसेच नागरिकांच्या सहभागातून सात कोटी ९७ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा झाली.
ग्रामपंचायतींच्या आर्थिक शिस्तीबरोबरच गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्रोतांचे बळकटीकरण करणे, सौरऊर्जेचा वापर वाढविणे आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड करणे अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.
जलसंधारण, सौरऊर्जा आणि पर्यावरण संवर्धनाला चालना
अभियानाच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील ७३४ जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यात आले. ग्रामीण भागातील पाणी उपलब्धता वाढविण्यासाठी आणि सिंचन व्यवस्थेला चालना देण्यासाठी पाच हजार २२४ सौरपंप कार्यान्वित करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जिल्ह्यात सात लाख १२ हजार ५८७ वृक्षांची लागवड करण्यात आली.
जलसंधारणाच्या कामांमुळे स्थानिक पातळीवरील जलस्रोत अधिक सक्षम करण्यास मदत झाली, तर सौरपंपांच्या वापरामुळे शेतीसाठी पर्यायी ऊर्जास्रोत उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले. वृक्षलागवडीच्या माध्यमातून हरित क्षेत्र वाढविणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे यावरही भर देण्यात आला.
शाळा, अंगणवाड्या आणि पशुवैद्यकीय केंद्रांचे सक्षमीकरण
ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ६५१ प्राथमिक शाळा, ८४६ अंगणवाडी केंद्रे आणि १५४ पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये निर्धारित मानकांनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा, बालसंगोपन व्यवस्था आणि पशुपालनाशी संबंधित सेवांचे सक्षमीकरण करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळाली.
याशिवाय, जिल्ह्यात २३० व्यायामशाळांची उभारणी करण्यात आली. ग्रामीण युवकांना व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला.
६० हजारांहून अधिक महिला ‘लखपती दीदी’
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही अभियानात महत्त्व देण्यात आले. जिल्ह्यातील ६० हजार ८३३ महिलांनी ‘लखपती दीदी’ उपक्रमांतर्गत प्रगती साधल्याची नोंद आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांच्या उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्यांचा सहभाग वाढविणे या उद्देशाने विविध प्रयत्न करण्यात आले.
दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्रे आणि यूडीआयडी कार्ड उपलब्ध करून देणे, तसेच पात्र नागरिकांपर्यंत सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील पुणे जिल्ह्याची कामगिरी ही ग्रामपंचायतींच्या सहभागातून विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून निर्माण केलेला आदर्श आणि पुणे जिल्हा परिषदेने मिळविलेले यश यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण विकासाच्या प्रयत्नांना नवी ओळख मिळाली आहे.


