बुलढाणा प्रतिनिधी
बुलढाणा : जमिनीच्या वादातून पोटच्या मुलानेच जन्मदात्री आई, सख्खा भाऊ आणि पुतण्याची धारदार चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे गुरुवारी घडली. या तिहेरी हत्याकांडामुळे सोमठाणा गावात एकच खळबळ उडाली असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
सरस्वती सुरडकर (७०), संजय सुरडकर (५५) आणि रणजीत सुरडकर (२५) अशी मृतांची नावे आहेत. शेतीच्या जमिनीच्या वादातून आरोपी दीपक सुरडकर याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी वाद विकोपाला गेल्यानंतर दीपकने घरात ठेवलेल्या धारदार चाकूने प्रथम आई सरस्वती, त्यानंतर भाऊ संजय आणि पुतण्या रणजीत यांच्यावर सपासप वार केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सोमठाणा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती चिखली पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. हत्येनंतर संशयित आरोपी दीपक सुरडकर घटनास्थळावरून फरार झाला आहे.
चिखली पोलीस ठाण्याच्या पथकाकडून आरोपीचा कसून शोध सुरू असून, त्याला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत. शेतीच्या जमिनीचा नेमका वाद काय होता आणि या हत्याकांडामागे आणखी काही कारण आहे का, याचा सखोल तपास चिखली पोलीस करत आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोमठाणा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


