भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ : शहरातील वरणगाव रोडवरील आलिशान वॉटर पार्कजवळ गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत तरुणाच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्याच्यावर एखाद्या वस्तूने हल्ला करून घातपात करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून, फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून आवश्यक पुरावे जमा केले आहेत.
तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास बाजारपेठ पोलिसांकडून सुरू आहे. लुटीच्या उद्देशाने हा प्रकार घडला का, पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला झाला का, यासह इतर शक्यताही तपासल्या जात आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रण पोलिसांकडून तपासले जात असून, त्यातून संशयित व्यक्ती किंवा घटनेशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का, याचा शोध घेतला जात आहे.
मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही
मृत तरुणाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून, बाजारपेठ पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण तसेच डोक्याला झालेल्या दुखापतीचे स्वरूप स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
वॉटर पार्कसारख्या गजबजलेल्या ठिकाणाजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्याने भुसावळ शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. या तरुणाचा मृत्यू अपघाती आहे की त्यामागे घातपात आहे, याचा तपास करून सत्य समोर आणण्याचे आव्हान बाजारपेठ पोलिसांसमोर आहे.


