मुंबई प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मोठ्या प्रमाणात बॅनर व कटआउट लावले जात असल्याने उद्यानाचे सौंदर्य तसेच डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची दृश्यता बाधित होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे उद्यान कटआउट व बॅनरमुक्त ठेवावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुंबई युवक आघाडीचे कार्याध्यक्ष विश्वास जाधव यांनी केली आहे.
उद्यान परिसरात सध्या लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर व कटआउट तातडीने हटवावेत आणि भविष्यात आवश्यक परवानगीशिवाय असे साहित्य लावले जाणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली. प्रशासनाने कारवाई न केल्यास कलेक्टर कार्यालयासमोर कायदेशीर व लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


