मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात मुंबई क्राईम ब्राँचने मोठी कारवाई केली आहे. क्राईम ब्राँचच्या युनिट-७ने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील विविध भागांतील सात बेकायदा क्लिनिकवर छापे टाकत तब्बल १० बोगस डॉक्टरांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
भांडूप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरिवली आणि दहिसर या परिसरांत वैद्यकीय अर्हता आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी नसतानाही क्लिनिक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पालिकेच्या वैद्यकीय पथकासोबत संयुक्त कारवाई करत संबंधित क्लिनिकवर अचानक धाडी टाकल्या.
पोलिसांच्या कारवाईत भांडूपमधील संतोष हेल्थ क्लिनिक आणि विनायक हेल्थ क्लिनिक, जोगेश्वरीतील हमदम दवाखाना आणि कोहिनूर दवाखाना, बोरिवलीतील अंकुश आयुर्वेदिक दवाखाना, दहिसरमधील दीपक हर्बल हेल्थ केअर क्लिनिक तसेच मानखुर्दमधील समर आयुर्वेदिक दवाखाना यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पदवी नसताना रुग्णांवर उपचार
तपासादरम्यान संबंधित व्यक्तींकडे आवश्यक वैद्यकीय अर्हता नसतानाही रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. गंभीर आजारांसह गुप्तरोग बरे करण्याचे दावे करून रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याचाही आरोप आहे.
विशेष म्हणजे काही ठिकाणी आरोपींकडून अॅलोपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचा वापर केला जात असल्याचे समोर आले. काही क्लिनिकमध्ये मुदतबाह्य औषधेही रुग्णांना दिली जात असल्याचे तपासात आढळल्याची माहिती आहे.
सुमारे २.२० लाखांचा वैद्यकीय साठा जप्त
या कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध औषधांच्या बाटल्या, सिरिंज, अँटीबायोटिक्स आणि इतर वैद्यकीय साहित्य असा सुमारे २ लाख २० हजार रुपयांचा बेकायदा वैद्यकीय साठा जप्त केला आहे.
दरम्यान, पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी एका व्यक्तीला एचआयव्हीची लागण असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर अशा बेकायदा पद्धतीने वैद्यकीय उपचार करणाऱ्या व्यक्तींकडून रुग्णांच्या आरोग्याला निर्माण होणाऱ्या धोक्याचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्टअंतर्गत भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोगस डॉक्टरांच्या नेटवर्कचा आणखी विस्तार आहे का, तसेच या क्लिनिकमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या किती आहे, याबाबतही पुढील तपास सुरू आहे.


