हिंगोली प्रतिनिधी
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यात चोंढी येथे पेट्रोल पंपाचा ताबा घेण्याच्या कारवाईदरम्यान इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. इंडियन ऑइलचे विक्री विभाग व्यवस्थापक महेश शेळके यांच्यावर खंजराने तब्बल सात वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
चोंढी येथील पेट्रोल पंप सील करून ताब्यात घेण्यासाठी महेश शेळके हे कंपनीच्या पथकासह गेले होते. यावेळी पेट्रोल पंपचालकाच्या कुटुंबीयांशी कंपनीच्या पथकाचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर शेळके यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात त्यांना सात वार करण्यात आले आणि गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणात पेट्रोल पंप मालकासह पाच जणांविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, हल्ल्यामागील नेमका वाद आणि संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सुरू आहे. काही आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या घटनेची केंद्र सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी महेश शेळके यांच्या हत्येचा तीव्र निषेध करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हे प्रकरण मांडून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे सांगितले आहे.
इंडियन ऑइलनेही महेश शेळके यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले असून, कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर झालेला हा हल्ला अत्यंत धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. कंपनीने त्यांच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
या घटनेमुळे शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, संवेदनशील कारवायांदरम्यान क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक सुरक्षा पुरवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.


