ठाणे प्रतिनिधी
ठाणे : घोडबंदर परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर मंगळवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. पूर्णेकर यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यानंतर कोयत्यानेही वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पूर्णेकर हे त्यांच्या कार्यालयात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. पूर्णेकर यांच्या डोक्यावर आणि मानेवरही वार झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे पोलिसांनी सांगितले.
जखमी पूर्णेकर यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण काय, तसेच हल्लेखोर कोण आहेत, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
प्रदीप पूर्णेकर हे मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर विभागाचे शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख आहेत. ते मानपाडा परिसरातील माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांचे भाऊ आहेत. सामाजिक क्षेत्रातही ते सक्रिय असून नशामुक्तीच्या उपक्रमांसह पोलिसांच्या विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या. त्यामुळे या हल्ल्यामुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
गोळीबाराची घटना समोर आल्यानंतर मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिसरातील परिस्थितीवर लक्ष ठेवत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हल्ल्याचे कारण आणि या घटनेमागे नेमके कोण आहेत, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


