मुंबई प्रतिनिधी
मुंबई : अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरात माथाडी कामगारांच्या नावाचा आधार घेत व्यापारी, व्यावसायिक आणि बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींवर दबाव टाकून खंडणी वसूल करणाऱ्या संघटित टोळीविरोधात एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या टोळीचा प्रमुख कन्नन चिन्नादुराई वन्नियार ऊर्फ ‘बडा कन्ना’ याला पोलिसांनी अटक केली आहे. टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, ‘सत्या आणि कन्ना’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळीतील सदस्य अंधेरी परिसरात दहशत निर्माण करून व्यावसायिकांकडून दरमहा हप्त्याच्या स्वरूपात पैसे मागत होते. परिसरात व्यवसाय किंवा काम करायचे असल्यास ठरावीक रक्कम देण्याची धमकी दिली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्वेतील कोंडीविटा रोड परिसरात माथाडी युनियनच्या नावावरून एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली होती. या घटनेत संबंधित व्यक्तीच्या डोक्यावर आणि पायावर गंभीर दुखापत झाली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. या प्रकरणी १७ ऑगस्ट २०२६ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच टोळीतील सात जणांना अटक केली होती. मात्र, मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेला बडा कन्ना फरार होता. अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. दरम्यान, टोळीचा आणखी एक प्रमुख आरोपी सत्यम गुरुखेल ऊर्फ ‘सत्या’ याच्यासह तीन साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या तपासात या टोळीने माथाडी कामगारांच्या नावाचा वापर करून संघटित पद्धतीने बेकायदेशीर कारवाया केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींविरोधात यापूर्वीही हत्या करण्याचा प्रयत्न, खंडणी व मारहाणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊन पोलिसांनी आरोपींविरोधात मकोका कायद्याच्या कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) अन्वये कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अंधेरी परिसरातील खंडणीखोरी आणि दहशतीच्या प्रकारांना आळा घालण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, या टोळीशी संबंधित इतर व्यक्ती आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे.


