नांदेड प्रतिनिधी
नांदेड : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतशिवारात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. लोहा तालुक्यातील बारूळ फाटा, सोनखेड येथे त्यांनी शेतकरी संदीप रामराव जायभाय यांच्या शेताला भेट देत सोयाबीन पिकाची पाहणी केली. ९ जुलै रोजी लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची सद्यस्थिती, पावसातील खंडामुळे झालेले परिणाम आणि संभाव्य नुकसान याची त्यांनी माहिती घेतली.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत शेतीच्या नुकसानीबरोबरच जनावरांसाठी चारा, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणासंबंधीच्या अडचणी जाणून घेतल्या. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना एकटे सोडले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रशासनाने परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घ्यावी, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि आवश्यक प्रशासकीय मदतीसाठी तातडीने पाठपुरावा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


