मुंबई प्रतिनिधी
मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकर यांचे बालपणीचे मित्र विनोद कांबळी यांचा वृद्धाश्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. २५ सप्टेंबर २०२६ रोजी समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये कांबळी ठाण्यातील ‘निदान’ या वृद्धांची देखभाल करणाऱ्या केंद्रात दिसत आहेत. त्यांच्या प्रकृतीची स्थिती पाहून क्रिकेट चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त होत असली, तरी कांबळी यांनी स्वतः या केंद्रातील सुविधा, स्वच्छता आणि तेथील वातावरणाचे कौतुक केले आहे.
Vinod Kambli’s latest video, he is presently at an elderly care centre in Thane.
Praying for his recovery soon. pic.twitter.com/6k1plg1aCl
— Abhishek ✨ (@ImAbhishek7_) September 25, 2026
व्हिडीओमध्ये कांबळी यांनी आपण सध्या ‘निदान’मध्ये असल्याचे सांगत तेथील व्यवस्था चांगली असल्याचे नमूद केले. येथे राहताना घरापासून दूर असल्याची भावना होत नसल्याचे तसेच तेथील लोकांकडून प्रेम आणि आदर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या व्हिडीओनंतर चाहत्यांनी कांबळी यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कांबळी गेल्या काही काळापासून आरोग्याच्या समस्यांमुळे चर्चेत आहेत. २०२४च्या अखेरीस त्यांना आरोग्यविषयक त्रासामुळे ठाण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीशी संबंधित विविध व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले होते. २०२६मध्येही ते सार्वजनिक ठिकाणी सहाय्य घेऊन चालताना दिसले होते.
क्रिकेट कारकिर्दीत कांबळी यांनी भारतासाठी १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी १,०८४ धावा करत चार शतके झळकावली, तर एकदिवसीय सामन्यांत त्यांच्या नावावर २,४७७ धावा आहेत. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी मुंबईतील शारदाश्रम विद्यामंदिरमध्ये एकत्र क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते.


