मुंबई प्रतिनिधी
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका उत्साहात आणि शांततेत सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरगाव चौपाटीवर उपस्थित राहून विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशभक्तांच्या उत्साहाचा आढावा घेतला. मुंबईतील विसर्जन मिरवणुकांसाठी पोलिस आणि महापालिकेने केलेल्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. मुंबई पोलीस देशातील आणि जगातील व्यावसायिक पद्धतीने काम करणाऱ्या दलांपैकी एक असल्याचे सांगत, मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेतली जात असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
बप्पा के विसर्जन समारोह में मीडिया से संवाद!
( मुंबई | 25-9-2026 )#Maharashtra #Mumbai pic.twitter.com/qnD5vrYc7w
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 25, 2026
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांनंतर बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस हा आनंदासोबत भावनिकही असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई आणि पुण्यात विसर्जन मिरवणुका मोठ्या कालावधीपर्यंत चालतात. दोन्ही शहरांमध्ये पोलिस आणि महापालिकेने चांगली व्यवस्था केली असून मिरवणुका शांततेत पार पडत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी सुरक्षितता आणि सावधगिरी बाळगत विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, पत्रकारांनी विरोधकांबाबत बाप्पाकडे काय मागितले, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. गणपती ही बुद्धीची देवता असल्याचे सांगत त्यांनी, विरोधकांना सुबुद्धी यावी आणि कुबुद्धीचे विसर्जन व्हावे, अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना असल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


