सातारा प्रतिनिधी
सातारा : आकाशपाळणा उभारण्यासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्राच्या परवानगीसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दीपक लक्ष्मण पोळ याला ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या प्रकरणात लाच मागण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप असलेले शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम आत्माराम शेवाळे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहरातील आळूचा खड्डा परिसरात आकाशपाळणा उभारण्यासाठी संबंधित व्यावसायिकाने १३ सप्टेंबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ना-हरकत परवान्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाच्या पाठपुराव्यासाठी ते हवालदार दीपक पोळ यांच्या संपर्कात आले. त्यावेळी पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या नावाने ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने त्यावेळी १५ हजार रुपये दिले असून उर्वरित रकमेची मागणी सुरू राहिल्यानंतर त्यांनी २३ सप्टेंबर रोजी सातारा एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीने पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत तडजोडीनंतर ११ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी सातारा शहरातील राजवाडा परिसरातील जुन्या दवाखान्याजवळ सापळा रचण्यात आला. ठरलेली ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार दीपक पोळ याला पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिल्याचे एसीबीच्या तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार शेवाळे आणि पोळ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.


