मुंबई प्रतिनिधी
मुंबई : देशातील बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची सलग अनेक दिवस गैरसोय होऊ नये यासाठी २७ सप्टेंबर रोजी, रविवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँक शाखा, कार्यालये, एटीएम-संलग्न शाखा आणि करन्सी चेस्ट रविवारी पूर्णपणे कार्यरत ठेवण्यास मंजुरी दिली आहे.
२६ सप्टेंबर हा चौथा शनिवार असून त्यानंतर २७ सप्टेंबरला रविवारची नियमित सुट्टी आहे. त्यानंतर २८, २९ आणि ३० सप्टेंबरला संप असल्याने ग्राहकांना सलग पाच दिवस प्रत्यक्ष बँकिंग सेवांमध्ये अडथळा येण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन २७ सप्टेंबरला सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रोख रक्कम जमा करणे, काढणे आणि इतर अत्यावश्यक बँकिंग कामे रविवारी करता येणार आहेत.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्यासह काही मागण्यांसाठी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान संपाची हाक दिली आहे. संपाचा परिणाम विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या शाखांवर होण्याची शक्यता आहे. मात्र, डिजिटल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय आणि एटीएमसारख्या सेवा उपलब्ध राहू शकतात.
ग्राहकांनी बँकेशी संबंधित अत्यावश्यक प्रत्यक्ष व्यवहार २७ सप्टेंबरपूर्वी नियोजित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सरकार आणि बँक व्यवस्थापनांकडून संप पुढे ढकलण्याचे आवाहनही करण्यात आले असून, ग्राहकांच्या अत्यावश्यक बँकिंग गरजा सुरू राहाव्यात यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.


