मुंबई प्रतिनिधी
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, भाविकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, विसर्जनासाठी समुद्रात उतरणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांच्या बंदोबस्तासोबतच समुद्री जीवांपासूनही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः गिरगाव, जुहू आणि आक्सा चौपाटी परिसरात **‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश’**चा वावर आढळत असल्याने नागरिकांनी समुद्रात उतरताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी लालबाग-परळ, गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, पवई तसेच मढ-मार्वे परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्हीसोबत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे. चौपाट्यांवर विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी अतिरिक्त तराफे, ट्रॉली आणि क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ नये, वाहतुकीचा खोळंबा होऊ नये तसेच ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण राहावे, यासाठी पोलिसांकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १८ हजार ९४० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. त्यांच्यासोबत एसआरपीएफ, आरएएफ, फोर्स वन, क्यूआरटी, दंगल नियंत्रण पथक, अॅण्टी ड्रोन पथक, होमगार्ड आणि मसुब जवानांचीही मदत घेतली जाणार आहे. ही माहिती सहआयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी दिली.
दरम्यान, दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनी प्रा. लि.चे महाव्यवस्थापक विक्रम शेलार यांनी समुद्रकिनारी जाणाऱ्या नागरिकांना जेलीफिशपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. यंदा पावसाळा संपत आला असला तरी सध्या जेलीफिश मोठ्या प्रमाणात किनाऱ्याजवळ आढळलेले नाहीत. मात्र, २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी समुद्रकिनाऱ्याजवळ त्यांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्ल्यू बॉटल जेलीफिशचा दंश झाल्यास तीव्र वेदना, जळजळ, सूज तसेच त्वचेवर लाल किंवा निळसर रंगाचे वळ उमटू शकतात. ही वेदना एक ते दोन तास राहू शकते. काही वेळा काखेत किंवा जांघेतही वेदना जाणवू शकतात. जेलीफिशच्या विषाची तीव्र ॲलर्जी असलेल्या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, मळमळ आणि चक्कर येण्यासारखी गंभीर लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे भाविकांनी समुद्रात खोलवर जाणे टाळावे, अनवाणी पाण्यात उतरू नये आणि जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करावे. दंश झाल्यास वेदना कमी करण्यासाठी दंश झालेला भाग साधारण २० मिनिटे गरम पाण्यात बुडवून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


