पुणे प्रतिनिधी
पुणे : गुन्ह्यातील आरोपींना पोलीस ठाण्यात मारहाण केल्यानंतर भररस्त्यात गुडघ्यावर चालवून, लाठी-काठ्यांनी मारहाण तसेच नागरिकांसमोर हात जोडून माफी मागण्यास भाग पाडल्याच्या गंभीर प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह १३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या चौकशीतील निष्कर्ष आणि निर्देशानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे.
या प्रकरणी सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक संकेत सतीश गोसावी यांनी स्वतः फिर्यादी होत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवणे, मारहाण करणे, धमकावणे तसेच लोकसेवक म्हणून कायदेशीर कर्तव्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. ३६३/२०२६ मधील आरोपी दिनेश उर्फ दीपक विकास नेटके याच्यासह सरफराज शेख, गणेश थोरात आणि दुर्वेश पवार हे चौघे ५ जुलै २०२६ रोजी दुपारी पोलिसांसमोर शरण आले होते. मात्र, त्यांना त्याच दिवशी रात्री उशिरा अटक दाखविण्यात आल्याचा आरोप आहे. शरण आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि अन्य पोलिसांनी आरोपींच्या हातापायांवर पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. ७ जुलै रोजी सायंकाळी पोलिसांनी चौघांना लेक टाऊन परिसरातील एसआरए कॉलनीच्या पार्किंग भागात नेल्याचा आरोप आहे. तेथे त्यांना सार्वजनिक ठिकाणी गुडघ्यावर चालण्यास भाग पाडण्यात आले. तसेच त्यांच्या हातापायांवर लाठी-काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले. नागरिकांसमोर हात जोडून जाहीर माफी मागण्यासही त्यांना भाग पाडल्याचा आरोप आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी आरोपींना परिसर सोडण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रकरणाला व्यापक स्वरूप आले. विशेष म्हणजे आरोपींना पोलीस ठाण्याबाहेर संबंधित ठिकाणी नेण्यात आल्याची नोंद पोलीस ठाण्याच्या जनरल डायरी अथवा वाहनाच्या लॉगबुकमध्ये नसल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.
मानवी हक्क आयोगाच्या चौकशीत गंभीर निरीक्षणे
या घटनेची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने स्वतःहून दखल घेत चौकशी सुरू केली. आयोगाच्या सत्यशोधन समितीने केलेल्या तपासणीत पोलिसांकडून करण्यात आलेले कृत्य बेकायदेशीर असल्याचे निष्कर्ष समोर आल्याचे प्रकरणात नमूद करण्यात आले आहे. आरोपींच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असतानाही त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये त्यांची नोंद करण्यात आली नसल्याचेही चौकशीत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
आयोगाच्या निर्देशानंतर पोलीस महासंचालकांनी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविले. त्यानंतर सीआयडीकडून तपासाची कार्यवाही सुरू करण्यात आली आणि आता संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
१३ पोलिसांविरोधात गुन्हा
या प्रकरणात मानसिंग पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), आण्णा मधुकर दराडे आणि निलेश राजेंद्र मोकाशी (दोघे पोलीस उपनिरीक्षक), फकीर (पोलीस उपनिरीक्षक), सुनील दादा हनवते (पोलीस हवालदार), सागर चंद्रकांत बोरगे, सोहम कैलास शेंडकर, राहुल अशोक औधकर, मितेश दत्तात्रय चोरमोले, रविंद्र शंकर गायकवाड, संदीप लक्ष्मण आगळे, सुतार आणि पवार (पोलीस अंमलदार) यांचा समावेश आहे.
संबंधित सर्वांविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ११५(२), १२७(२), १२७(३), १३१, ३५२, ३५१(२), १९८ आणि १९९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


