पुणे प्रतिनिधी
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा अधिक कडक उपाययोजना आखली आहे. ध्वनिवर्धक आणि स्पीकरसोबतच आता ढोल-ताशा पथकांच्या आवाजाचीही डेसिबल पातळी तपासली जाणार आहे. निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन आढळल्यास संबंधित पथकावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
विसर्जन मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर सुमारे १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण केले जाणार आहे. मिरवणूक पुढे सरकत असताना विविध ठिकाणी आवाजाची नोंद घेतली जाईल. निर्धारित मर्यादेपेक्षा ध्वनिपातळी अधिक असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
गणेश मंडळांच्या ध्वनिवर्धक यंत्रणेबाबतही पोलिसांनी मर्यादा निश्चित केली आहे. मिरवणुकीत चार ‘टॉप’ आणि चार ‘बेस’ स्पीकर वापरण्याची परवानगी आहे. यापेक्षा अधिक स्पीकर आढळल्यास संपूर्ण ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त केली जाऊ शकते. तसेच प्लाझ्मा स्पीकर आणि मिड-प्रेशर स्पीकरवरील निर्बंध कायम राहणार आहेत. ढोल-ताशा पथकांकडून वापरल्या जाणाऱ्या ‘टोल’ वाद्यावरील बंदीचीही अंमलबजावणी केली जाणार आहे.
विशेष म्हणजे ढोल-ताशा पथकातील वादकांची किंवा ढोल-ताशांची संख्या निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र पथकातील वादकांची संख्या कितीही असली तरी एकत्रित ध्वनिपातळी निर्धारित मर्यादेत ठेवण्याची जबाबदारी संबंधित पथकाची राहणार आहे. त्यामुळे मोठ्या पथकांनाही ध्वनिमर्यादेचे पालन करावे लागणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या कालावधीत ध्वनिपातळीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत २१ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी अधिक कडक होण्याचे संकेत आहेत.


