ग्रेटर नोएडा :
उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवेवर बुधवारी मध्यरात्री स्लीपर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ग्रेटर नोएडा परिसरातील दयानतपूर गावाजवळ ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बस ग्रेटर नोएडाहून आग्र्याच्या दिशेने जात होती. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. अचानक बसमध्ये आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबविल्यानंतर अनेक प्रवाशांनी खिडक्यांतून बाहेर पडत आपला जीव वाचविला. मात्र आग झपाट्याने पसरल्याने काही प्रवासी बसमध्येच अडकले.
UP Chief Minister Yogi Adityanath took cognizance of the road accident in Greater Noida. The Chief Minister expressed condolences to the families of the deceased. The Chief Minister directed officials to ensure proper medical treatment for the injured. The Chief Minister spoke to… https://t.co/udoxnMaZrk
— ANI (@ANI) September 24, 2026
आगीमुळे बसमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमधून उड्या मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस, सुरक्षा पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
पहाटे साडेतीनच्या सुमारास या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली. मृतांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, बसला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचा तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी आगीदरम्यान बसमधून फटाके फुटल्यासारखे आवाज येत असल्याचे सांगितले. बसमधील सामानासोबत बेकायदा फटाके नेले जात होते का, या शक्यतेचाही तपास केला जात असल्याचे वृत्त आहे. मात्र आग लागण्याचे निश्चित कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
आगीच्या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव यमुना एक्सप्रेसवेवरील काही ठिकाणी काही काळ वाहतूक थांबविण्यात आली. आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. या घटनेने प्रवासी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


