नाशिक प्रतिनिधी
नाशिक : आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मे २०२२ मध्ये झालेल्या आरती कापसे हत्या प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने तिचा पती विशाल राजाराम कापसे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्याच्यावर २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
मांडसांगवी येथे १६ मे २०२२ रोजी रात्री सुमारे ११ वाजता हा प्रकार घडला होता. आरती कापसे आणि तिचा पती विशाल कापसे यांच्यासह इतर आरोपींमध्ये जुन्या वादातून भांडण झाले. या वेळी आरतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तपासात समोर आले.
दरम्यान, विशाल कापसे याने जवळ पडलेले लाकडी दांडा असलेले लोखंडी फावडे आरतीच्या डोक्यावर आणि तोंडावर मारल्याचे निष्पन्न झाले. या मारहाणीत आरतीचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक इरफान शेख यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान विशाल कापसे याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणातील आरोपी क्रमांक दोन ते पाच यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. २१ सप्टेंबर रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल एन. रोकडे यांनी हा निकाल दिला.
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे यांनी काम पाहिले. कोर्ट अधिकारी पोलिस उपनिरीक्षक जयवंत गुळे, पैरवी कर्मचारी संगीता बहिर तसेच आडगाव पोलिसांनी प्रकरणाच्या पाठपुराव्यात भूमिका बजावली.

