ठाणे प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय शंकर सांगडे (५७) यांचे सोमवारी अचानक निधन झाले. कर्तव्यावर आल्यानंतर ठाण्यातील कोर्ट नाका येथील शासकीय विश्रामगृहात असताना त्यांना अचानक छातीत दुखू लागले आणि चक्कर आली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे.
सांगडे हे कल्याण नियंत्रण कक्षात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या सुमारे तीन वर्षांपासून त्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगरक्षक पथकात नियुक्ती होती. डोंबिवलीतील पलावा सिटी परिसरात ते कुटुंबासह वास्तव्यास होते. सोमवारी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर आल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही.
विजय सांगडे यांच्या आकस्मिक निधनाची माहिती समोर येताच पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांचे पार्थिव ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सिव्हिल रुग्णालय परिसरात त्यांना मानवंदना आणि श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ प्रशांत कदम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस दलाच्या वतीने सांगडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बंदुकीची सलामी देऊन त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे.
कर्तव्य बजावत असतानाच पोलीस उपनिरीक्षक विजय सांगडे यांच्यावर काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय आणि आप्तेष्ट असा परिवार आहे. सांगडे यांच्या आकस्मिक निधनाने पोलीस दलातही शोककळा पसरली आहे.

