मुंबई प्रतिनिधी
घाटकोपर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर पूर्वेकडील कामराज नगर परिसरात गणेश मंडळाच्या अध्यक्षाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मंडळाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी मुख्य आरोपी रौनक बाळू सोनावणे याच्यासह सात जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मृताची ओळख राजेश राजेंद्रन देवेंदर (३५) अशी असून ते कामराज नगर येथील ‘सेव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब’च्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते. शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बीएमसी शाळेसमोर हा प्रकार घडला.
पोलिसांच्या माहितीनुसार, रौनक सोनावणे याने गणेश मंडळाचा कार्यकर्ता विनय शर्मा याला मारहाण केली. याची माहिती मिळाल्यानंतर राजेश देवेंदर घटनास्थळी गेले. त्यांनी रौनकला जाब विचारत लहान मुलांवर हात न उचलण्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
यानंतर रौनकने फोन करून आपल्या साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. आकाश सोनावणे, अक्षय सोनावणे, अश्विन उनवणे, श्रेयस, बबलू आणि स्टीफन नाडर उर्फ अण्णा हे तेथे आले. त्यानंतर राजेश यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण करण्यात आली.
हल्ल्यादरम्यान काही आरोपींनी राजेश यांना पकडून ठेवले आणि रौनक सोनावणे याने चाकूने त्यांच्या छातीवर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर राजेश यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर घाटकोपर येथील पांचोली रुग्णालयातही त्यांना नेण्यात आले; तेथेही डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आनंद तिवारी याच्यावरही चाकूने वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात तो जखमी झाला असून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
राजेश यांच्या मेहुणी दिप्ती राजू पिल्लई यांच्या फिर्यादीवरून पंतनगर पोलिसांनी रौनक सोनावणे, आकाश सोनावणे, अक्षय सोनावणे, अश्विन उनवणे, श्रेयस, बबलू आणि स्टीफन नाडर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये कलम १०३(१) अंतर्गत हत्या, तसेच घातक शस्त्राने दुखापत, मारहाण, धमकी आणि इतर संबंधित कलमांचा समावेश आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील तुकाराम चव्हाण करीत आहेत.

