सांगली प्रतिनिधी
सांगली : सांगलीवाडी परिसरात चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयासमोरील जे. के. पवार यांच्या गाळ्यात एचडीएफसी बँकेसाठी बसवण्यात आलेल्या एटीएममध्ये तब्बल १० लाख ३४ हजार ८०० रुपयांची रोकड होती. मशीनसह रोकड चोरीला गेल्याने एकूण सुमारे ११ लाख ८४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी एनसीआर कार्पोरेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे स्थानिक प्रतिनिधी विकास आमनगी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित कंपनीकडून सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी बँकांसाठी एटीएम मशीन बसवण्यात आली आहेत. सांगली शहर आणि परिसरातही मोठ्या संख्येने एटीएम केंद्रे असून, अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसल्याचे समोर येत आहे.
सांगलीवाडीतील संबंधित एटीएम मशीन मागील सुमारे वर्षभरापासून या ठिकाणी कार्यरत होते. एटीएममध्ये रोकड भरण्याची जबाबदारी विकास आमनगी यांच्याकडे होती. मंगळवारी सायंकाळी त्यांनी मशीनमध्ये आणखी ५ लाख रुपये भरले होते. त्यावेळी मशीनमध्ये आधीची ५ लाख ३४ हजार ८०० रुपयांची रोकड शिल्लक होती. त्यामुळे एटीएममध्ये एकूण १० लाख ३४ हजार ८०० रुपये जमा झाले होते.
मंगळवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी एटीएम केंद्राला लक्ष्य केले. केंद्रात सुरक्षा रक्षक नसल्याची संधी साधत त्यांनी मशीनच्या जोडणाऱ्या वायरी तोडल्या आणि संपूर्ण एटीएम मशीन वाहनातून घेऊन पोबारा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुधवारी सकाळी नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. एटीएम केंद्रात मशीनच नसल्याचे दिसून आल्यानंतर परिसरात एकच चर्चा सुरू झाली.
घटनेची माहिती बँक अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर बँकेचे विभागीय व्यवस्थापक विशाल यादव यांनी सकाळी सुमारे सात वाजता एनसीआर कंपनीचे प्रतिनिधी विकास आमनगी यांना एटीएम चोरीची माहिती दिली. आमनगी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केल्यानंतर एटीएम मशीन रोकडसह चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.
सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक तपास केला असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू असून, परिसरातील उपलब्ध माहितीच्या आधारे तपास केला जात आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात यापूर्वीही एटीएम चोरीच्या घटना घडल्या आहेत. मिरज तालुक्यातील बेडग-आरग मार्गावर चोरट्यांनी जेसीबीच्या मदतीने एटीएम मशीन उखडून नेले होते. त्या मशीनमध्ये सुमारे २७ लाख रुपयांची रोकड होती. बुधगाव येथे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून सुमारे १७ लाख ४० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. तसेच डफळापूर येथे कारला दोरी बांधून एटीएम मशीन ओढून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर सांगलीवाडीतील घटनेने एटीएम केंद्रांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक एटीएम केंद्रांवर रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांना अशा ठिकाणांना लक्ष्य करण्याची संधी मिळत असल्याचे चित्र आहे. एटीएम मशीनच पळवून नेण्याच्या घटना घडूनही सुरक्षा व्यवस्थेबाबत ठोस उपाययोजना का होत नाहीत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर तरी संबंधित बँका आणि यंत्रणा एटीएम केंद्रांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

