मुंबई प्रतिनिधी
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची नवी रचना आकार घेत असताना पक्षाच्या प्रचारशैलीतही बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची स्वतंत्र राजकीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी पक्षाकडून राज्यभर जनसंपर्क दौरे आणि महिलांचा मोठा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची गेल्या काही वर्षांपासून गाजणारी ‘एकच वादा, अजित दादा’ ही घोषणा बदलून ‘वहिनी आहेत ना!’ किंवा ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ ही नवी टॅगलाईन वापरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र या घोषणेची पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा स्वीकारली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि त्यांच्या टीमकडून काही सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार यांचा महाराष्ट्रभर दौरा, महिलांशी थेट संवाद आणि मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क कार्यक्रम घेण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले जाते.
२७ सप्टेंबरला नाशिकमध्ये शिबिर
राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिक येथे राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी सहभागी होणार असून आगामी राजकीय वाटचाल, संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीची तयारी यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमातून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची नवी दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
‘एकच वादा, अजित दादा’ची जागा बदलणार?
२०१९ पासून ‘एकच वादा, अजित दादा’ ही घोषणा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची प्रमुख ओळख बनली होती. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवार गटाच्या कार्यक्रमांमध्ये ही घोषणा मोठ्या प्रमाणावर वापरली गेली. आता अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदू बदलल्याने प्रचारातील घोषणाही बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘वहिनी आहेत ना!’ या घोषणेच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांना कार्यकर्ते आणि जनतेशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
पक्षांतर्गत अस्वस्थता कायम
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांवरून चर्चा सुरू आहेत. जुन्या नेत्यांसोबत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका पक्षातील काही नेत्यांकडून मांडली जात आहे. सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या राष्ट्रीय भूमिकेबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र यासंदर्भात अंतिम निर्णय अधिकृतपणे जाहीर झालेला नाही.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला नव्या चेहऱ्यासह पुढे नेण्याचे आव्हान सुनेत्रा पवार यांच्यासमोर आहे. त्यामुळे ‘एकच वादा, अजित दादा’नंतर ‘वहिनी आहेत ना!’ ही घोषणा प्रत्यक्षात पक्षाची नवी ओळख बनते का, तसेच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची संघटनात्मक पुनर्बांधणी कितपत होते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

