नालासोपारा प्रतिनिधी
सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टवरून नालासोपारा परिसरात राजकीय वादाला तोंड फुटले असून, शिवसेना (शिंदे गट) नेत्या तथा वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका हेमलता सिंह यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवरील पोस्टच्या रागातून एका तरुणाला हॉटेलमध्ये बोलावून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवरूनच संबंधित वादाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर अर्जुन दुबे नावाच्या व्यक्तीने विश्वकर्मा यांना नालासोपारा परिसरातील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. विश्वकर्मा हे हॉटेलमध्ये पोहोचले असता तेथे शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका हेमलता सिंह आणि त्यांचे सहकारी अमरीश यांच्यासह काही जण उपस्थित होते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर विश्वकर्मा यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली तसेच कानशिलात मारण्यात आली. त्यानंतर बांबूच्या काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी पोलिसांकडे केला आहे. या मारहाणीमध्ये आपल्याला दुखापत झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हल्ल्यादरम्यान सोन्याची साखळी हिसकावून घेण्यात आली आणि सुमारे २० हजार रुपये किमतीचा स्मार्टफोनही नेण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे.
या घटनेनंतर विश्वकर्मा यांनी तुळिंज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी हेमलता सिंह यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडियावरील पोस्ट तसेच इतर उपलब्ध पुरावे तपासले जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून तक्रारी दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोन्ही तक्रारींच्या आधारे तपास सुरू असून, पीडित व्यक्तीसह आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील नगरसेविका हेमलता सिंह आणि अन्य काही संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याचे सांगण्यात येते.
सोशल मीडियावरील एखाद्या पोस्ट किंवा कमेंटवरून थेट वाद निर्माण होऊन तो मारहाणीपर्यंत पोहोचल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पदावरील व्यक्ती आणि त्यांच्या समर्थकांवर मारहाणीचे आरोप झाल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

