मुंबई प्रतिनिधी
बेस्टच्या कंत्राटी बसच्या अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी गोरेगावमध्ये पुन्हा एका बसचा अपघात झाला. ओबेरॉय मॉलसमोरील सिग्नलजवळ वळण घेत असताना कंत्राटी बस एका खासगी चारचाकी वाहनाला घासून पुढे मेट्रो रेल्वेच्या खांबावर आदळली. या दुर्घटनेत बेस्ट कर्मचारी राजेंद्र सोनावणे (५८) आणि प्रवासी मंगेश मोडलेकर (५७) हे दोघे जखमी झाले. दोघांवर जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
दिंडोशी आगारातील मातेश्वरी कंत्राटदाराची ही बस मार्ग क्रमांक ७०५ वर धावत होती. दिंडोशी आगारातून भाईंदर स्थानक पूर्वेकडे जाताना ओबेरॉय मॉलसमोरील सिग्नलजवळ उड्डाणपुलाखाली बस उजवीकडे वळत होती. त्यावेळी बसचा मागील भाग खासगी वाहनाला घासला आणि त्यानंतर बस मेट्रोच्या खांबावर धडकली.
अपघाताची माहिती मिळताच मातेश्वरी कंपनीचे अपघात निरीक्षक कुलकर्णी यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. पश्चिम विभागातील अपघात विशेष निरीक्षक नवाळे यांची चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली. वनराई पोलिसांच्या सूचनेनुसार अपघातग्रस्त बस बेस्टच्या टोइंग वाहनाने हटवून वनराई पोलीस ठाण्यासमोर उभी करण्यात आली.
खासगी वाहनाच्या चालकाने दिलेल्या तक्रारीवरून बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताच्या नेमक्या कारणाचा पोलीस तपास सुरू आहे.
दरम्यान, कंत्राटी बसच्या वाढत्या अपघातांमुळे बेस्टच्या प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत कंत्राटी अर्थात वेट-लीज बसचे २४९ अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. या अपघातांत १० जणांचा मृत्यू, तर ४६ जण जखमी झाले होते. त्यामुळे चालकांचे प्रशिक्षण, बसची तांत्रिक स्थिती, देखभाल आणि कंत्राटदारांच्या कामकाजावर कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे.
अपघातांची संख्या वाढत असताना बेस्ट प्रशासनाने कंत्राटी बसचालकांसाठी पुनर्प्रशिक्षण सुरू केले असले, तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम कितपत झाला, असा सवाल आता उपस्थित होत आहे. मुंबईकरांच्या जीवाशी निगडित असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अपघातानंतरची कारवाई नव्हे, तर अपघात रोखण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

