मुंबई प्रतिनिधी
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच आता ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र सरकारने हाके यांना दिलेली ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा तातडीने काढून घ्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. येत्या १५ दिवसांत सुरक्षा काढली नाही, तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनीही सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. हाके हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करत असल्याने दोन्ही बाजूंतील वाद अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. सोलापूर येथे लक्ष्मण हाके आणि काही मराठा युवकांमध्ये झटापट झाल्याची घटना समोर आली असून, संबंधित युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने हाके यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. प्रा. लक्ष्मण हाके यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याची गरज काय, असा सवाल महेश डोंगरे यांनी उपस्थित केला. हाके यांना निवडणुकीत केवळ २७३ मते मिळाली असताना तसेच कोणते मोठे समाजकार्य किंवा योगदान नसताना सरकारने त्यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा का दिली, असा प्रश्न त्यांनी केला. तसेच चार विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ), पोलीस गाड्या आणि अन्य सुरक्षा व्यवस्था कशासाठी देण्यात आली, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रा. लक्ष्मण हाके हे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करून जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप डोंगरे यांनी केला. त्यांच्या सुरक्षेचा फेरविचार करून ती तातडीने काढून घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षा काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील मराठा समाजातील युवक तसेच अठरा पगड जातीतील नागरिकांनी आपल्या भागातील पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदने द्यावीत, असे आवाहनही डोंगरे यांनी केले. या माध्यमातून नागरिकांनी आपल्या सुरक्षेची मागणी करावी, असे त्यांनी म्हटले.
येत्या १५ दिवसांत लक्ष्मण हाके यांचे पोलीस संरक्षण काढले नाही, तर न्यायालयात धाव घेण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असून, त्यानंतरही सरकारने निर्णय घेतला नाही तर पोलीस महासंचालक कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डोंगरे यांनी दिला. हाके यांची सुरक्षा काढल्यास राज्यातील वातावरण शांत होण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला.

