मुंबई प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केल्यानंतर आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. १५ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघून १९ सप्टेंबरला सकाळी १० वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, त्यांच्या सहकाऱ्याने आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज दाखल केला असून, तब्बल ५ हजार आंदोलकांना परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व अटी-शर्तींचे पालन करू, असेही अर्जात स्पष्ट करण्यात आले आहे.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १६ वा दिवस आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली; मात्र मराठा आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये, अशी विनंती सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, ही विनंती धुडकावत जरांगे यांनी मुंबईत येण्याची घोषणा केली आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर आझाद मैदानावर उपोषणासह मोठा मोर्चा काढण्याची तयारीही सुरू आहे.
जरांगे यांनी मुंबईकडे येण्याचा मार्ग, मुक्कामाची ठिकाणे आणि मुंबईत पोहोचण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यांच्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहनही जरांगे यांनी समर्थकांना केले आहे.
या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या परवानगी अर्जात आंदोलनाचा मार्ग, मुंबईत पोहोचण्याची तारीख आणि आझाद मैदानावरील आंदोलनाची माहिती देण्यात आली आहे. ५ हजार जणांना आंदोलनासाठी परवानगी द्यावी आणि प्रशासनाच्या सर्व अटींचे पालन केले जाईल, अशी भूमिका अर्जाद्वारे मांडण्यात आली आहे.
यापूर्वी ओबीसी समाजानेही आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. त्यामुळे आता मराठा आंदोलनासाठी दाखल झालेल्या अर्जावर मुंबई पोलीस काय निर्णय घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि मोठ्या गर्दीचे आव्हान प्रशासनासमोर असताना जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी मिळणार की निर्बंध लादले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

