ठाणे प्रतिनिधी
डोंगराळ आणि वनक्षेत्रालगत असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा तसेच वसतिगृहांमध्ये १९ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’ राबविण्यात येणार आहे. सर्पदंशाच्या घटना टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, साप आढळल्यास कसे वागावे आणि सर्पदंश झाल्यास तातडीने कोणते उपाय करावेत, याबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या अनेक आश्रमशाळा आणि वसतिगृहे ही डोंगर, जंगल तसेच दुर्गम भागांच्या सान्निध्यात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा साप, विंचू आणि अन्य वन्यजीवांशी संपर्क येण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः रात्रीच्या वेळी शाळा परिसर, वसतिगृह, स्वच्छतागृह, पाण्याची ठिकाणे तसेच झुडपांच्या परिसरात साप आढळण्याच्या घटना घडू शकतात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मनातील सापाबाबतची भीती दूर करून त्यांना सुरक्षित व वैज्ञानिक पद्धतीने परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अभियानांतर्गत प्रत्येक शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि वसतिगृहामध्ये किमान एक तासाचे विशेष जनजागृती सत्र घेण्यात येणार आहे. स्थानिक सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ, आरोग्य विभाग आणि वन विभागाच्या सहकार्याने ही सत्रे आयोजित केली जाणार आहेत. सापांची ओळख, साप आढळण्याची संभाव्य ठिकाणे, सापांपासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि सर्पदंशाच्या वेळी तातडीने करावयाची कृती याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.
साप आढळल्यास त्याला पकडण्याचा अथवा मारण्याचा प्रयत्न करू नये, सुरक्षित अंतर राखावे आणि घाबरून धावपळ करण्याऐवजी शांतपणे त्या ठिकाणापासून दूर जावे, यावर विशेष भर दिला जाणार आहे. सर्पदंश झाल्यासही घाबरून चुकीचे उपचार करण्यापेक्षा बाधित व्यक्तीची हालचाल कमीत कमी ठेवणे आणि विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येणार आहे.
सर्पदंशाबाबत ग्रामीण आणि आदिवासी भागांत आढळणारे अनेक गैरसमज दूर करण्यावरही अभियानात भर असेल. सर्पदंश झाल्यानंतर जखम कापणे, रक्त शोषून घेणे, घट्ट दोर बांधणे, विविध वनौषधी किंवा घरगुती उपचार करणे अशा चुकीच्या पद्धती टाळण्याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक उपचार आणि वेळेवर वैद्यकीय मदत हाच जीव वाचविण्याचा योग्य मार्ग असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे, जनजागृतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अभियानादरम्यान शाळेच्या परिसरात जिवंत साप आणून प्रात्यक्षिक करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष साप दाखविण्याऐवजी सुरक्षित माध्यमातून, चित्रफिती, डिजिटल सादरीकरणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून माहिती देण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या डिजिटल स्टुडिओमध्येही सर्पदंश प्रतिबंध आणि आपत्कालीन प्रतिसादाबाबत तज्ज्ञांची विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत.
आपत्कालीन संपर्क यंत्रणा होणार अद्ययावत
सर्पदंशाची घटना घडल्यास उपचारासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी आश्रमशाळा आणि वसतिगृहांची आपत्कालीन संपर्क यंत्रणा अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्याध्यापक, अधीक्षक आणि परिचारिका यांना दर तीन महिन्यांनी आपत्कालीन संपर्काची माहिती तपासून अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
यामध्ये जवळच्या आरोग्य संस्थेचे नाव व दूरध्वनी क्रमांक, अँटी-स्नेक वेनम उपलब्ध असलेल्या आरोग्य केंद्रांची किंवा साठवणूक केंद्रांची माहिती, आपत्कालीन वाहतुकीची व्यवस्था, संबंधित संपर्क क्रमांक तसेच स्थानिक सर्पमित्रांचे दूरध्वनी क्रमांक यांचा समावेश असेल. त्यामुळे सर्पदंशाची घटना घडल्यास कोणत्या रुग्णालयात तातडीने उपचार मिळू शकतात, याची माहिती शाळा प्रशासनाकडे आधीपासून उपलब्ध राहणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी सर्पदंशाचा अधिसूचित आजार म्हणून समावेश केल्याच्या पार्श्वभूमीवर या अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्पदंशाच्या घटनांची वेळेत नोंद करणे, त्यांचा अहवाल सादर करणे, घटनांचे निरीक्षण करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. त्याचबरोबर अँटी-स्नेक वेनम उपलब्ध असलेल्या आरोग्य केंद्रांची आणि साठवणूक केंद्रांची माहिती अद्ययावत ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे.
अभियानाच्या कालावधीत प्रत्येक शाळेत राबविण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमांची आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित विभागाला सादर करावी लागणार आहे. त्यामुळे हे अभियान केवळ औपचारिक जनजागृतीपुरते मर्यादित न राहता आश्रमशाळांमधील सर्पदंश प्रतिबंध आणि आपत्कालीन व्यवस्थेचा आढावाही घेणारे ठरणार आहे.
भीती नव्हे, विज्ञान; विलंब नव्हे, तातडीचा उपचार! डोंगर-जंगलाच्या सान्निध्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्पदंशाचा धोका हा केवळ आरोग्याचा प्रश्न नसून त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, सर्पदंश टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळवून देणे, या त्रिसूत्रीवर या अभियानाचा मुख्य भर राहणार आहे.

