मुंबई प्रतिनिधी
गणरायाच्या आगमनासाठी कोकणाकडे धावणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या, वैद्यकीय सुविधा, प्रवासी सहाय्य केंद्रे, गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र व्यवस्था, अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा, स्वच्छतेसाठी वाढीव मनुष्यबळ तसेच स्थानकांवर गणेशोत्सवाचा उत्साह निर्माण करणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने विशेष रेल्वेसेवाही चालविण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेने १० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या आणि उत्सवानंतर मुंबईसह अन्य भागांकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे प्रवाशांना स्थानकांवर गर्दीचा त्रास होऊ नये, तिकीट मिळविताना अडचणी येऊ नयेत तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, यासाठी कोकण रेल्वेने विविध पातळ्यांवर नियोजन केले आहे.
उधना जंक्शन, विश्वामित्री, वलसाड, वडोदरा जंक्शन, नागपूर जंक्शन, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, दिवा, पनवेल यांसह चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन आणि ठोकूर या स्थानकांना जोडणाऱ्या मार्गांवर विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे पर्याय मिळणार आहेत.
आरोग्यसेवेसाठी स्वतंत्र यंत्रणा
गणेशोत्सवातील प्रचंड गर्दीत प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर १२ सप्टेंबरपासून प्रथमोपचार केंद्रे सुरू केली जाणार आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या समन्वयाने या केंद्रांवर निमवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असतील.
चिपळूण आणि रत्नागिरी येथील आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात राहणार आहेत. प्रमुख स्थानकांवर मोफत आरोग्य तपासणी, आरोग्य जनजागृती उपक्रम आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. रक्तदाब आणि रक्तातील साखर तपासण्यासाठी विशेष वैद्यकीय बूथही उपलब्ध असतील. गरज भासल्यास शासकीय तसेच संबंधित रुग्णालयांच्या रुग्णवाहिकांची मदत तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तिकीट व्यवस्थेपासून खाद्यपदार्थांपर्यंत नियोजन
गणेशोत्सवाच्या काळात स्थानकांवरील खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. ही बाब लक्षात घेऊन गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी सर्व खाद्यपदार्थ विक्री केंद्रे सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तिकीट खिडक्यांवर गर्दी टाळण्यासाठी विशेष रांगांची व्यवस्था केली जाणार आहे.
माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड आणि सावंतवाडी रोड येथे पूर्वमुद्रित यूटीएस तिकिटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यूटीएस तिकिटांसाठी पीआरएस काऊंटरचाही वापर करता येणार आहे. रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ स्थानकांवर एम-यूटीएस सहाय्यक सुविधा उपलब्ध असतील.
माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी येथे रेल यात्री सहायता केंद्रे २४ तास कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. प्रवाशांना आवश्यक माहिती आणि मदत तातडीने मिळावी यासाठी स्वतंत्र पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
गर्दी वाढल्यास ‘होल्डिंग एरिया’
गणेशोत्सवाच्या काळात काही स्थानकांवर अचानक मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे होल्डिंग एरिया निश्चित करण्यात येणार आहेत. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी या जागांचा वापर केला जाईल.
स्थानकांवर नियमित घोषणांसोबत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष सूचना दिल्या जाणार आहेत. पुढील प्रवासासाठी प्रवाशांना बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी कोकण रेल्वे आणि एसटी महामंडळ यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय आणि तिकीटविना प्रवास रोखण्यासाठी स्थानकांवर तसेच रेल्वेगाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
सुरक्षा यंत्रणा २४ तास ‘अलर्ट’
गणेशोत्सवातील वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. स्थानकांवर आणि रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी सुरळीतपणे हाताळण्यासाठी पुरेसा सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्थानकांवर २४ तास नजर ठेवली जाणार असून रेल्वे सुरक्षा दल स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने काम करणार आहे.
स्थानकांवरील स्वच्छता अबाधित राहावी यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. प्रवाशांनीही कचरा न टाकता रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे स्थानकांवर गणेशोत्सवाचा जल्लोष
यंदाचा गणेशोत्सव केवळ प्रवासापुरता मर्यादित न ठेवता स्थानकांवर उत्सवी वातावरण निर्माण करण्याचेही कोकण रेल्वेने नियोजन केले आहे. विविध स्थानकांवर आकर्षक रोषणाई, रांगोळी आणि विशेष गणेशोत्सव सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहेत.
माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. संगीत कार्यक्रम, भजने, जाखडी, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, कराओके आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येणार आहेत. स्थानिक कलाकारांनी यासाठी संबंधित स्टेशन मास्तरांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांचे स्वागतही यंदा खास पद्धतीने करण्याचे नियोजन आहे. ड्रोनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी, बँडवादन, मुलांसाठी फुगे आणि रंगीत खडू यांसारख्या उपक्रमांद्वारे उत्सवी वातावरण निर्माण केले जाणार आहे. काही स्थानकांवर पूजा साहित्य, सजावटीच्या वस्तू, फळे, फुले, काजू, मोदक तसेच विविध ब्रँडच्या प्रचारासाठी स्टॉल्सचीही व्यवस्था केली जाणार आहे.
प्रवाशांसाठी मोफत पाण्याचीही व्यवस्था
गणेशोत्सवातील उन्हाळी-दमट हवामान आणि गर्दी लक्षात घेऊन स्वयंसेवी संस्था तसेच खासगी संस्थांच्या सहकार्याने प्रवाशांसाठी वैद्यकीय शिबिरे आणि मोफत पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या तसेच स्थानकांवर प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवाचा प्रवास सुरक्षित आणि आनंददायी व्हावा यासाठी प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर शिस्त पाळावी, स्वच्छता राखावी आणि रेल्वे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षित रेल्वे वाहतूक, अखंडित प्रवासी सुविधा आणि सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

