निखिल गाडे / मुंबई
मुंबई : चेंबुर येथील पांजरपोळ परिसरात सुमारे २० मांजरे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या मांजरांच्या शरीरावर गंभीर जखमा असून काही मांजरे छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी आरसीएफ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
स्थानिक प्राणीमित्र रुबीना पठाण यांच्या निदर्शनास ऑगस्ट महिन्यात काही मांजरे गंभीर जखमी तसेच मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी आणखी सहा मांजरे त्याच परिसरात अशाच अवस्थेत आढळली. ५ सप्टेंबर रोजीही एक मांजर मृतावस्थेत आढळून आले. या प्रकारामुळे परिसरातील प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पेटा इंडियाने रुबीना पठाण यांना पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी मदत केली. त्यानुसार आरसीएफ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम ३२५ तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मांजरांच्या मृत्यूमागे नेमके कोण आहे आणि हा प्रकार कशामुळे घडला, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीस पेटा इंडियाने ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याने पेटा इंडियाच्या info@petaindia.org या ई-मेलवर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे पेटा इंडियाने स्पष्ट केले आहे.

