पुणे प्रतिनिधी
पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या २८ वर्षीय प्रथमेश दिलीप देशमुख या तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रथमेश हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील खासापुरी येथील रहिवासी होता. त्याच्या पश्चात आई आणि चार विवाहित बहिणी असा परिवार आहे. वडिलांचे यापूर्वीच निधन झाले होते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्रथमेश गेल्या आठ महिन्यांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता.
प्रथमेशने UPSC आणि MPSC या दोन्ही स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. मात्र, अथक प्रयत्न करूनही त्याला पूर्वपरीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही. पुण्यात राहून अभ्यासाचा खर्च, दैनंदिन गरजा आणि परीक्षेची तयारी यांचा आर्थिक भार वाढत गेला. प्राथमिक माहितीनुसार, त्याच्यावर अडीच लाख रुपयांहून अधिक कर्ज झाले होते. त्यामुळे आर्थिक अडचणी, परीक्षेतील अपयश आणि भवितव्याची चिंता यांचा त्याच्यावर ताण वाढत असल्याचे समोर आले आहे.
घटनेच्या आदल्या दिवशी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास प्रथमेश आपल्या खोलीवर परतला होता. त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून विश्रामबाग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
महिनाभरापासून तणावात असल्याची माहिती
घरची आर्थिक परिस्थिती, डोक्यावर वाढलेले कर्ज आणि स्पर्धा परीक्षेत वारंवार येणारे अपयश यामुळे प्रथमेश गेल्या काही काळापासून मानसिक तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गावी परतण्याचाही तो विचार करीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याने आत्महत्येचा निर्णय नेमका कोणत्या कारणामुळे घेतला, याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यामुळे प्राथमिक कारणांच्या आधारे अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
‘सरकारने जबाबदारी स्वीकारावी’; यशोमती ठाकूर आक्रमक
दरम्यान, पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका केली आहे. प्रथमेश देशमुख हा मूळचा धाराशिवचा असून पुण्यात MPSC परीक्षेची तयारी करीत होता, असे सांगत ठाकूर यांनी स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा मुद्दा उपस्थित केला.
MPSCच्या पेपरफुटीच्या आरोपांचा संदर्भ देत या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडत असताना सरकारने त्याची जबाबदारी स्वीकारून परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. MPSCचे पेपर फुटत असल्याचा आरोप करत त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा दावाही त्यांनी केला.
मात्र, प्रथमेशच्या आत्महत्येचा पेपरफुटीशी थेट संबंध असल्याचे अद्याप पोलिस तपासातून सिद्ध झालेले नाही. त्यामुळे या घटनेमागील नेमकी कारणे तपासातून स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवरील वाढता ताण पुन्हा ऐरणीवर
प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न घेऊन दरवर्षी हजारो विद्यार्थी पुण्यात दाखल होतात. मात्र, स्पर्धा परीक्षांची वाढती स्पर्धा, दीर्घकाळ सुरू राहणारी तयारी, राहण्याचा आणि शिक्षणाचा वाढता खर्च, आर्थिक अडचणी तसेच परीक्षेतील अनिश्चितता यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक दबाव निर्माण होतो. प्रथमेशच्या मृत्यूने या प्रश्नाकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे.
एका कुटुंबाचा आधार असलेला, चार बहिणींचा एकुलता एक भाऊ आणि प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणारा तरुण आज या जगात नाही. प्रथमेशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्नही या घटनेनिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

