मुंबई प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे येथे बेदरकारपणे कार चालवत आठ वर्षांच्या मुलाला फरफटत नेल्याच्या प्रकरणातील आरोपी महिला चालक मेधा रावल हिला न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सत्र न्यायालयाने सोमवारी ४८ वर्षीय मेधा रावल हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
गेल्या आठवड्यात वांद्रे येथील जिजामाता गार्डनजवळ हा अपघात झाला होता. कार्मेल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेणारा अंश गुप्ता हा रस्ता ओलांडत असताना मेधा रावल चालवत असलेल्या इनोव्हा कारची त्याला धडक बसली. अपघातानंतर नागरिकांनी कार थांबवून गंभीर जखमी अंशला तातडीने होली फॅमिली रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच अंशचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर अंशचे वडील रवींद्र गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी मेधा रावल हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, २८१ आणि १२५ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अटक झाल्यानंतर आरोपी महिलेने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. गुन्ह्याचे स्वरूप आणि प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत न्यायालयाने रावल हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

