क्रीडा प्रतिनिधी
मुंबई : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात तब्बल २८ वर्षांनंतर एक दुर्मीळ योगायोग जुळून येण्याची शक्यता आहे. येत्या ३ ऑक्टोबर रोजी भारतीय पुरुष क्रिकेटचे दोन संघ एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांमध्ये मैदानात उतरू शकतात. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी हा दिवस विशेष ठरणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना ३ ऑक्टोबर रोजी मुल्लांपूर येथे दुपारी २ वाजता होणार आहे. त्याच दिवशी जपानमधील निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेतील पदकांचे सामने होणार आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली, तर ३ ऑक्टोबर रोजी सुवर्णपदकासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. उपांत्य फेरीत पराभव झाल्यास कांस्यपदकासाठीच्या सामन्यात भारताचा सामना होईल. त्यामुळे एकाच दिवशी भारताचे दोन पुरुष क्रिकेट संघ दोन वेगवेगळ्या ठिकाणी खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
यापूर्वी १२ सप्टेंबर १९९८ रोजी असाच योगायोग घडला होता. क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, अजय जडेजा आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांचा समावेश असलेला भारतीय संघ कॅनडाविरुद्ध मैदानात उतरला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना १५७ धावा केल्या आणि कॅनडाचा डाव अवघ्या ४५ धावांत गुंडाळत ११२ धावांनी विजय मिळवला होता.
त्याच दिवशी टोरांटो येथे सहारा फ्रेंडशिप कप स्पर्धेत भारताचा दुसरा संघ पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील या संघात सौरव गांगुली, राहुल द्रविड, जवागल श्रीनाथ, अजित आगरकर आणि नवज्योतसिंग सिद्धू यांसारख्या खेळाडूंचा समावेश होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा तीन विकेट्सनी पराभव केला होता.
आता २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, ३ ऑक्टोबरचा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम नोंदविणारा ठरू शकतो.

