मुंबई प्रतिनिधी
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते पालिताना दरम्यान विशेष रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०९०२३ वांद्रे टर्मिनस–पालिताना विशेष रेल्वेची पहिली फेरी आज, ६ सप्टेंबर रोजी धावणार आहे. याशिवाय मुंबई सेंट्रल–अहमदाबाद तसेच मुंबई सेंट्रल–इंदूर मार्गावरील विशेष रेल्वेगाड्यांच्या सेवांनाही नोव्हेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे गुजरात आणि मध्य प्रदेशकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक ०९०२३ वांद्रे टर्मिनस–पालिताना विशेष ६ सप्टेंबरला रात्री ७.२५ वाजता वांद्रे टर्मिनसहून रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२५ वाजता पालिताना येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०९०२४ पालिताना–वांद्रे टर्मिनस विशेष ७ सप्टेंबरला रात्री ८ वाजता पालितानाहून सुटेल आणि ८ सप्टेंबरला सकाळी ९.३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.
या विशेष रेल्वेला प्रवाशांच्या सोयीसाठी मार्गातील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. बोरिवली, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, आणंद, अहमदाबाद, बोटाद, धोळा, सोनगढ आणि सिहोर या स्थानकांवर गाडी थांबणार आहे. या गाडीमध्ये शयनयान तसेच सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे उपलब्ध असतील.
अहमदाबाद विशेषला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
दरम्यान, मुंबई सेंट्रल–अहमदाबाद विशेष रेल्वेसेवेच्या फेऱ्यांनाही पश्चिम रेल्वेने मुदतवाढ दिली आहे. या गाडीच्या सेवा अनुक्रमे २५ आणि २६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे मुंबई आणि अहमदाबाददरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेसेवेचा लाभ मिळणार आहे.
इंदूर विशेषच्या फेऱ्याही वाढल्या
मुंबई सेंट्रल–इंदूर मार्गावरील विशेष रेल्वेगाड्यांनाही नोव्हेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ०९०७९/०९०८० या विशेष रेल्वेगाड्या अनुक्रमे २९ आणि ३० नोव्हेंबरपर्यंत, तर ०९०८५/०९०८६ या गाड्या अनुक्रमे २७ आणि २८ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहेत.
प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकाची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे. या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
गुजरात आणि मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती मागणी, सणासुदीच्या काळातील संभाव्य गर्दी आणि नियमित गाड्यांवरील वाढता प्रवासी भार लक्षात घेता विशेष रेल्वेसेवा आणि मुदतवाढीचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

