मुंबई प्रतिनिधी
जगभरात संघर्ष आणि अस्थिरतेचे वातावरण असताना जग अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी ‘ब्रिक्स’ देशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. ब्रिक्स देशांना पुरातन संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला असून, हे देश आकांक्षी दक्षिणी जगताचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे परस्पर सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आर्थिक संवादाच्या माध्यमातून जगाला अधिक सुरक्षित व स्थिर करण्यासाठी या देशांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘एपी ग्लोबाले’च्या वतीने महाराष्ट्र सरकार आणि ‘ब्रिक्स युथ अलायन्स’च्या भागीदारीत आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम-२’चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील ताज महाल पॅलेस येथे झाले. या वेळी ‘एपी ग्लोबाले’च्या संचालक जान्हवी पवार यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेटिसोव्ह, ब्राझीलचे महावाणिज्यदूत जोसे माउरो दा फोन्सेका कोस्टा कौटो, चीनचे महावाणिज्यदूत क्विन जिए आणि दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत जी. ई. लाबाने यांच्यासह राजनैतिक, उद्योग आणि विचारविश्वातील मान्यवर उपस्थित होते.
‘ब्रिक्स’मध्ये विविधतेतही साम्य
ब्रिक्स देशांच्या संस्कृतींमध्ये मोठी विविधता असली, तरी या देशांना एकत्र आणणारे अनेक समान धागे आहेत. या सर्व देशांना पुरातन संस्कृतीचा वारसा असून, जगाला देण्यासारखे त्यांच्याकडे मोठे सांस्कृतिक आणि वैचारिक भांडार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
“जागतिक जीडीपीमध्ये ब्रिक्स देशांचा वाटा सुमारे ४० ते ४५ टक्के आहे. या देशांमधील सहकार्य आणखी वाढल्यास जग अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा राहील. नागरिकांमधील प्रत्यक्ष संपर्क, संस्कृती व मूल्यांची देवाणघेवाण आणि आर्थिक संवादातून हे उद्दिष्ट साध्य करता येईल,” असे फडणवीस म्हणाले.
राजकीय संवादापेक्षा नागरिकांचा संवाद महत्त्वाचा
‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’च्या आयोजनाबद्दल फडणवीस यांनी ‘एपी ग्लोबाले’चे अभिनंदन केले. या मंचावर राजनैतिक क्षेत्राबरोबरच उद्योग, विचारविश्व आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर एकत्र आले असून, परस्पर संवादाची त्यांची इच्छा महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
“आज जगभरात संघर्ष आणि विभाजित जगाची चर्चा होत आहे. मात्र, ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’ विविध देशांतील लोकांना एकत्र आणण्याचे काम करीत आहे. केवळ राजकीय संवादापेक्षा नागरिकांमधील प्रत्यक्ष संवादातून जग अधिक चांगल्या पद्धतीने एकत्र येऊ शकते,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पाच देशांच्या संस्कृतीचे स्मृतिचिन्हांत दर्शन
फोरमच्या उद्घाटनावेळी ब्रिक्सच्या पाच देशांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन घडविणाऱ्या स्मृतिचिन्हांचे अनावरण करण्यात आले. भारताच्या कलासंस्कृतीचे प्रतीक असलेल्या नटराजाच्या मूर्तीबरोबरच दक्षिण आफ्रिकेचे हेअरशिल्ड, चीनचे कॅलिग्राफी शिल्ड, रशियाचे साहित्य आणि ब्राझीलच्या फुटबॉलचे प्रतीक असलेल्या स्मृतिचिन्हांचा यामध्ये समावेश होता.
या स्मृतिचिन्हांचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित देशांच्या महावाणिज्यदूतांच्या हस्ते करण्यात आले.
‘वसुधैव कुटुंबकम्’चा विचार जगासाठी मार्गदर्शक
भारतीय संस्कृतीचा मूलाधार असलेला ‘वसुधैव कुटुंबकम्’चा विचार आजच्या संघर्षमय जगाला दिशा देऊ शकतो, असेही फडणवीस यांनी सांगितले. भारत ही जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असून, एकेकाळी जागतिक व्यापारात भारताचा मोठा वाटा होता. भारताने केवळ व्यापारच नव्हे, तर विचार आणि मूल्यांचाही जगभर प्रसार केला.
“अनेक शतकांपूर्वी जगाच्या विविध भागांत बौद्ध धर्माचा प्रसार झाला. युद्धाशिवाय जग जिंकता येते, हे भारताने आपल्या विचारातून दाखवून दिले. आजच्या काळात याच विचारांची जगाला अधिक गरज आहे,” असे फडणवीस म्हणाले.
श्रीकृष्णाच्या संदेशाचाही दाखला
जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी भगवान श्रीकृष्णाच्या संदेशाचाही उल्लेख केला. श्रीकृष्णाने सर्वसमावेशकतेचा विचार दिला आणि सत्याच्या विजयाचा संदेश दिला. आजच्या अस्थिर व विभाजित जगात विविध देश एकत्र येण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा वेळी ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’सारखे व्यासपीठ परस्पर संवाद आणि सहकार्य वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे त्यांनी नमूद केले.

