मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण बृहन्मुंबई परिसरात १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. ९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून २३ सप्टेंबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे, मिरवणुका काढणे तसेच मिरवणुकीदरम्यान लाऊडस्पीकर, ध्वनिवर्धक, बँड आणि फटाक्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(३) सह कलम १०(२) अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे. विविध स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरात सार्वजनिक शांततेचा भंग, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, बेकायदा जमाव, दंगल अथवा संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नेमके कोणते निर्बंध?
या १५ दिवसांच्या कालावधीत पुढील बाबींवर निर्बंध राहणार आहेत
• पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे.
• कोणत्याही व्यक्ती किंवा गटाने सार्वजनिक मिरवणूक काढणे.
• मिरवणुकीदरम्यान लाऊडस्पीकर किंवा ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करणे.
• मिरवणुकीत बँड अथवा वाद्ये वाजवणे.
• मिरवणुकीदरम्यान फटाके फोडणे.
मात्र, या आदेशाचा अर्थ मुंबईतील दैनंदिन जीवन पूर्णपणे ठप्प होणार असा नाही. नागरिकांचे नियमित व्यवहार सुरळीत राहावेत, यासाठी विविध आवश्यक आणि नियमित उपक्रमांना स्पष्टपणे सूट देण्यात आली आहे.
विवाह, अंत्यविधींना सूट
विवाह समारंभ, वैवाहिक कार्यक्रम तसेच अंत्यविधी आणि अंत्ययात्रांना या प्रतिबंधात्मक आदेशातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांसाठी नागरिकांना नेहमीप्रमाणे सहभागी होता येणार आहे.
कंपन्या, सहकारी संस्था, क्लब, संस्था आणि संघटनांच्या वैधानिक बैठका तसेच त्यांच्या नियमित कामकाजासाठी होणाऱ्या जमावांनाही निर्बंध लागू होणार नाहीत.
शाळा-महाविद्यालये, न्यायालये आणि कार्यालयांचे कामकाज सुरूच
शैक्षणिक संस्थांमधील नियमित शैक्षणिक उपक्रमांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
त्याचप्रमाणे न्यायालयीन कामकाज, सरकारी आणि निमशासकीय कार्यालयांतील अधिकृत कामकाजासाठी होणारी गर्दी यांनाही या आदेशातून सूट आहे. कारखाने, दुकाने आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांचे नियमित कामकाजही सुरू राहणार आहे.
चित्रपटगृहे, नाट्यगृहेही सुरू राहणार
चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच अन्य मनोरंजनाच्या ठिकाणी चित्रपट, नाटके आणि कार्यक्रम पाहण्यासाठी होणाऱ्या प्रेक्षकांच्या उपस्थितीलाही प्रतिबंध नाही. त्यामुळे शहरातील मनोरंजन क्षेत्राचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे.
पोलिसांची परवानगी घेतल्यास मिरवणुकीला परवानगी
प्रतिबंधात्मक आदेश असला तरी प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमावर सरसकट बंदी घालण्यात आलेली नाही. संबंधित परिमंडळाचे पोलीस उपायुक्त (झोनल डीसीपी) आणि सक्षम वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या परवानगीने विशिष्ट सभा किंवा मिरवणुकीला सूट मिळू शकते.
त्यामुळे या कालावधीत सार्वजनिक मिरवणूक, सभा किंवा मोठ्या जमावाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांनी संबंधित पोलिस प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे.
उल्लंघन केल्यास कारवाई अटळ
प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. पोलिसांनी नागरिकांना आदेशाचे पालन करून सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
विशेष म्हणजे, २३ सप्टेंबरला आदेशाची मुदत संपली तरी त्याच्या कालावधीत झालेल्या उल्लंघनांवरील तपास, कायदेशीर कार्यवाही किंवा दंडात्मक प्रक्रिया आपोआप संपणार नाही. आदेश लागू असताना सुरू झालेली कारवाई पुढेही सुरू ठेवता येणार आहे. तसेच त्या कालावधीत झालेल्या उल्लंघनासाठी आकारण्यात आलेली शिक्षा, दंड किंवा अन्य कायदेशीर परिणाम आदेश संपल्यानंतरही कायम राहतील.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई पोलिसांनी या आदेशाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देश दिले असून सार्वजनिक ठिकाणे, न्यायालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये आदेशाच्या प्रती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांना नियमांची माहिती मिळावी यासाठी विविध माध्यमांतूनही त्याची प्रसिद्धी केली जात आहे.
दरम्यान, हा आदेश ९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून २३ सप्टेंबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहणार असून, परिस्थितीनुसार तो बदलण्याचा किंवा मागे घेण्याचा अधिकार प्रशासनाकडे राहणार आहे.

